आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:42+5:302021-06-20T04:27:42+5:30
वाशिम : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून अशा कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाचे ...
वाशिम : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून अशा कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाचे पालकत्व वाशिमच्या शिवाजी शिक्षण संस्थेने स्वीकारले आहे. या संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांनी गत पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे.
विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना शेती करताना अडचणी येतात. सततच्या नापिकीमुळे कर्जाचा भरणा करणे अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही. कर्जाची परतफेड कशी करावी याची चिंता शेतकऱ्यांना लागते. या चिंतेतूनच काही शेतकरी मृत्यूला कवटाळतात. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये म्हणून शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष तथा अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांनी शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये अशा कुटुंबातील पाल्यांना मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम सुरू केला. या अनुषंगाने अॅड. सरनाईक यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत जवळपास १२ शाळा येतात.