पालकांना ‘एसएमएस’व्दारे कळविला वार्षिक परीक्षेचा निकाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:52 PM2020-05-12T17:52:08+5:302020-05-12T17:52:19+5:30
शिरपूर येथील कै. कोंडबातात्या ढवळे विद्यालय, संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयाने पुढाकार घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे शाळा बेमुदत बंद असून वार्षिक परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. असे असले तरी प्रथम सत्राचे गुण, अंतर्गत मुल्यमापन, प्रात्यक्षिक आणि चाचणी परीक्षेच्या आधारे वार्षिक निकाल तयार करून तो पालकांना ‘एस.एम.एस.’व्दारे कळविण्यात आला. यासाठी शिरपूर येथील कै. कोंडबातात्या ढवळे विद्यालय, संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयाने पुढाकार घेतला.
ऐन शालेय परीक्षांच्या कालावधीतच कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने तोंड वर काढले. यामुळे वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नाही. सोबतच खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद करण्यात आल्या. परिणामी, शालेय शिक्षण विभागाने यंदा परीक्षा रद्द केल्या. असे असले तरी पुढील वर्गात प्रवेश देताना वार्षिक परीक्षांचा निकाल लागलेला असणे नियमानुसार आवश्यक असून प्रथम सत्राचे गुण, अंतर्गत मुल्यमापन, प्रात्यक्षिक आणि चाचणी परीक्षेच्या आधारे वार्षिक निकाल तयार करून तो पालकांना ‘एस.एम.एस.’व्दारे कळविण्यात आला.
कै. कोंडबातात्या ढवळे विद्यालय व संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयातील ५ वी ते ९ वी आणि ११ वी मध्ये शिक्षण घेणाºया जवळपास १२०० विद्यार्थ्यांचा निकाल ठरविण्यात आला आहे. तो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एसएमएस व दुरध्वनीची मदत घेण्यात येत आहे. आतापर्यंत शेकडो पालकांपर्यंत हा निकाल पोहचविण्यात आला. लॉक डाऊन हटविल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना त्यांच्या आधीच्या वर्गातील वार्षिक निकाल जाहीर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी प्रथम सत्राचे गुण, अंतर्गत मुल्यमापन, प्रात्यक्षिक आणि चाचणी परीक्षेच्या आधारे वार्षिक परीक्षेचा निकाल तयार करून तो पालकांना ‘एस.एम.एस.’व्दारे कळविण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन हटविण्यात आल्यानंतर आणि रितसर शाळांचे सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देखील देण्यात येणार आहेत.
- टी.ए. नरळे
माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम