२५ टक्के मोफत प्रवेशाच्या आॅनलाइन अर्जांसाठी पालकांची गडबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:30 PM2018-02-18T14:30:45+5:302018-02-18T14:34:04+5:30
वाशिम: शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर करण्यास वाशिम जिल्ह्यत गत आठवड्यापासून सुरुवात झाली आहे.
वाशिम: शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर करण्यास वाशिम जिल्ह्यत गत आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. आपल्या पाल्यास चांगल्या शाळेत मोफत प्रवेश मिळावा म्हणून निकषात बसणाºया पालकांकडून अर्ज सादर करण्याची गडबड जिल्ह्यात सुरू असून, येत्या २८ फेब्रुवारीपर्यंतच ही मुदत असल्याने विविध ठिकाणी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकवर्गाची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १०२ शाळांचा समावेश असून, या शाळांत मोफत प्रवेशासाठी एकूण पटसंख्येनुसार ११७३ जागा आहेत. आरटीई मान्यता असलेल्या शाळांमध्ये मानोरा तालुक्यातील ९, कारंजा तालुक्यातील १०, रिसोड तालुक्यातील १२, मालेगाव तालुक्यातील १८, मंगरुळपीर तालुक्यातील १९ आणि वाशिम तालुक्यातील ३० शाळांचा समावेश आहे. या १०२ शाळांतील ११७३ जागांसाठी १८ फेब्रुवारीपर्यंत २६२ अर्ज सादर करण्यात आलेले आहेत. आॅनलाइन अर्ज भरताना १ ते ३ व तीन पेक्षा जास्त अंतरावरील १० शाळांचे पर्याय पालकांना देता येणार आहे. आता आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठी केवळ ९ दिवसांची मुदत राहिली असल्याने पालक मंडळी विविध सेवा केंद्रांवर आॅनलाइन अर्ज सादर करण्यासाठी घाई करीत आहेत. आॅनलाइन अर्ज सादर करतानाच प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी रहिवासी दाखला, आधार कार्ड, वीज देयक, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, पालक भाड्याने राहत असल्याचे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडे करारनामा, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, प्रवर्ग आणि दिव्यांग वगळता इतर सर्व घटकांसाठी एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला, जन्माचा दाखला:, ग्रामपंचायत महापालिका नगरपालिका अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन आदि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पालक मंडळीची मोठी धांदलघाई सुरू आहे.