मंगरुळपीर न.प.ची शाळा बनली पार्किंग स्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:01+5:302021-09-22T04:46:01+5:30
मंगरुळपीर : शहरातील नामांकित आणी उच्च शैक्षणिक दर्जा असलेल्या नगरपरिषद शाळा क्र.२ हे सध्या अवैध पार्किंग झोन बनले ...
मंगरुळपीर : शहरातील नामांकित आणी उच्च शैक्षणिक दर्जा असलेल्या नगरपरिषद शाळा क्र.२ हे सध्या अवैध पार्किंग झोन बनले असून खासगी वाहनधारक या शाळेच्या आवारात वाहने ऊभी करताना नेहमी दिसतात. तसेच काही आंबटशौकीन या शाळेचा गैरमार्गासाठी वापर करत असून शाळेच्या शैक्षणिक पवित्रतेच्या ठिकाणाला काळिमा फासत असल्याचा प्रकार दिसतो. सर्व प्रकार त्या शाळेला गेट नसल्यामुळे होत असल्याचे चित्र आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा जरी बंद असल्या तरी शालेय कामकाज सुरू असते. विकासाच्या बाता मारणाऱ्या नगरपरिषदेच्या कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना हा बोभाटा दिसत नाही की हेतुपुरस्सर ते कानाडोळा करत आहेत असे शहरवासीयांमध्ये बाेलल्या जात आहे. काही फळ विक्रेते सुध्दा येथे नियमित दिसून येत आहेत.
पोलीस प्रशासनाने हा प्रश्न तातडीने सोडवून संबंधित विभागाने शाळेला गेट बसवावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
आंबटशाैकींनाचा अड्डा
शहरातील नगरपरिषदेची शाळा प्रसिध्द असून येथील अनेक विद्यार्थी उच्चपदावर आहेत. या शाळेची दशा मात्र फारच वाईट झाली असून आंबटशाैकीन लाेकांचा संध्याकाळी या परिसरात वावर दिसून येताे. जुगार, दारुडे माेठया प्रमाणात या भागात दिसून येत आहेत.