रस्त्यावरील पार्किंग देतेय अपघातास निमंत्रण, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:05+5:302021-02-17T04:49:05+5:30
वाशिम शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने विविध प्रशासकीय कामकाजासाठी जिल्हाभरातील लोक या ठिकाणी येतात. त्यामुळे शहरात मोठी वर्दळ असते. ...
वाशिम शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने विविध प्रशासकीय कामकाजासाठी जिल्हाभरातील लोक या ठिकाणी येतात. त्यामुळे शहरात मोठी वर्दळ असते. शहरातील पाटणी चौक, पोस्ट ऑफिस चौक, अकोला नाका, पुसद नाका परिसरात रात्री उशिरापर्यंत गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणच्या बाजारपेठेत विविध कामांसाठी शेकडो लोक आपली वाहने घेऊन येतात. त्यात सर्वाधिक प्रमाण दुचाकींचे असले तरी चारचाकी वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. बाजारपेठेतील बहुतांश दुकानांसमोर पार्किंगसाठी जागाच नसल्याने खरेदीसाठी येणारी मंडळी आपली वाहने थेट रस्त्यावरच उभी करतात. परिणामी, रहदारीला आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊन अपघातास निमंत्रण मिळते. या समस्येवर नियंत्रणासाठी शहर वाहतूक शाखेकडून पाटणी चौक, अकोला नाका, पोस्ट ऑफिस चौक आणि पुसद नाका परिसरात वाहतूक शाखेचे पोलीसही तैनात करण्यात येतात. हे पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईसुद्धा करतात. त्यानंतरही ही समस्या मात्र नियंत्रणात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-------------
शहराची संख्या ७३७०९
दुचाकीची संख्या ५५२५३
चारचाकी ७१०९
--------------
पाटणी चौकातील स्थिती सर्वांत गंभीर
वाशिम शहरातील सर्वच मुख्य मार्ग आणि चौकांत नियमांचे उल्लंघन करून वाहने रस्त्यांवर उभी करण्यात येत असल्याने रहदारीसह वाहतुकीला अडथळा निर्माण होत असला तरी पाटणी चौकाची स्थिती सर्वांत गंभीर आहे. हा चौक शहरातील मुख्य बाजारपेठेचा चौक असल्याने चारही बाजूंच्या दुकांनासमोर दिवसभर शेकडो वाहने रस्त्यावर उभी केल्याचे दिसते.
-----------
उल्लंघनप्रकरणी २०० रुपये दंड
१) वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेचे पोलीस नियमानुसार कारवाई करतात. त्यात हेल्मेट, कागदपत्रांचा अभाव, आसन मर्यादेसह रस्त्यावर वाहन उभे करण्याच्या प्रकाराचा समावेश आहे.
२) वाहतुकीच्या नियमातील नो-पार्किंगचे उल्लंघन करून रस्त्यांवर वाहने उभी करण्यात येत असल्याचा प्रकार वारंवार शहरात घडत आहे. त्यावर नियंत्रणासाठी तैनात पोलीस दंडात्मक कारवाई करीत असून, या प्रकारात प्रत्येकाला २०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे.