पार्किंगवरून हाणामारी, १८ जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: June 16, 2014 12:12 AM2014-06-16T00:12:09+5:302014-06-16T00:45:17+5:30
रेल्वे पार्किंग परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.
वाशिम : मोटरसायकलच्या पार्कींगचे पैसे मागितल्याच्या कारणावरून १४ जूनच्या रात्री १0.३0 वाजता रेल्वे पार्किंग परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १८ लोकांविरूध्द भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ३0७, ३९५ व आर्म अँक्ट ४/२५ अन्वये गुन्हे दाखल केले आहे.
वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये शुभम् अशोकसिंग ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, रमेश इंगोले यांना मोटरसायकल पार्कींगचे पैसे मागितले असता त्यांनी पैसे दिले नाही. पैसे मागितल्याचा राग आल्याने पार्कींगचे कर्मचारी अमित वाकोडे व महेश परवरे यांना तलवारीने जीवाने मारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय महेशच्या गळ्यातील सोन्याची चैन, अंगठी व नगदी ७00 रूपये असा एकुण ७0 हजार ७00 रूपयाचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. अशाप्रकारच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अतुल इंगोले, लक्ष्मण इंगोले, रमेश इंगोले, पंकज इंगोले चा लहान भाऊ (रा. काळे फैल) , प्रशांत बोरकर व ४ ते ५ अज्ञात इसमांविरूध्द भादंविचे कलम १४७, १४८, १४९, ३0७, ३९५, ५0६ व आर्म अँक्ट ४/२५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. विरूध्द गटातील रमेश इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, ते मित्राच्या वडिलांना रेल्वे स्टेशनवर पोहचविण्यासाठी गेले होते.यावेळी महेश रमेश परवरे, अमित ठाकुर, शुभम ठाकुर, अमोल ठाकुर, मुकेश ठाकुर, बंटी ठाकुर, विशाल ठाकुर व विशाल कोकाटे यांनी संगनमत करून त्यांच्याजवळील रोख ८३00 रूपये, एक मोबाईल व सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून मारहाण केली. यावरून महेश रमेश परवरे, अमित ठाकुर, शुभम ठाकुर, अमोल ठाकुर, मुकेश ठाकुर, बंटी ठाकुर, विशाल ठाकुर व विशाल कोकाटे विरूध्द भादंवि चे कलम १४७, १४८, १४९, ३0७, ३९५ व आर्म अँक्ट ४/२५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी महेश परवरे, अमित ठाकुर, शुभम ठाकुर व अमोल ठाकुर यांना अटक केली.