पोहरादेवीत उसळला जनसागर!
By admin | Published: July 10, 2017 02:05 AM2017-07-10T02:05:10+5:302017-07-10T02:05:10+5:30
गुरुपौर्णिमा उत्साहात : हजारो शिष्यांनी टेकविला गुरुचरणी माथा
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे हजारो शिष्यांनी गुरू राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज यांच्या चरणी माथा टेकून महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त ९ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी हजेरी लावली.
यावेळी जय सेवालाल, जय संत रामराव महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमा दिनी ९ जुलै रोजी संत डॉ. रामराव महाराज यांच्या हस्ते माता जगदंबा, जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेतला. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘शिरा’ या गोड पदार्थ प्रसादाचा भोग देऊन आपला जन्मसोहळा साजरा केला. यावेळी देशभरातून आलेल्या भाविकांनी जय सेवालाल, जय संत रामराव महाराजांचा गजर करीत एकच जयघोष केला. या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी भाविकांना आशीर्वाद देताना संत रामराव महाराजांनी संदेश दिला. या संदेशात त्यांनी मार्गदर्शन केले की, आई भवानी, संत सेवालाल सजीव सृष्टीला सुखी ठेव, पाऊस पडू दे, अशी आराधना केली. यावर्षी पिकांचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा व्यक्त करून येत्या ३ दिवसात सर्वदूर पाऊस पडेल, असे भाकित वर्तविले. सर्वांनी खेळीमेळीने बंधू व समान भावनेने आनंदाने वागावे, असे संदेशात म्हटले.
गुरुपाौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आयोजकांसह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. सेवाआश्रम प्रांगणात हजारो भाविकांनी रांगेने बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गुरूच्या भेटीला देशभरातील कानाकोपऱ्यातील हजारो भक्तांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला हजेरी लावली. गुरुपौर्णिमेच्या पहिल्या दिवशी पालकमंत्री ना. संजय राठोड, आमदार हरिभाऊ राठोड, भारतीय बंजारा क्रांतिदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई, देवीदास राठोड, दिलीप जाधव, देवीसिंग पवार, मुंबईचे मंगलभाई राठोड, औरंगाबादचे अॅड.बी.डी. पवार, साई राठोड, सज्जन राठोड, अनिल राठोड, इंजिनिअर रमेश पवार, कर्नाटकचे आमदार उमेश जाधव आदींची उपस्थिती होती.
पायदळ दिंड्यांनी वेधले भाविकांचे लक्ष
देशभरातील हैद्राबाद, कर्नाटक , तेलंगणा व जालना जिल्ह्यातील गुलखंड, पाटोदा, परतूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, जिंतुर, यासह यवतमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील पायदळ दिंड्या या गुरुपौर्णिमेला काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे दाखल झाल्या होत्या. या दिंड्यांमध्ये जय सेवालाल, बोलो जय सेवालाल आदींचा गजर करण्यात आला. कानाकोपऱ्यातून आलेल्या या पायदळ दिंड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जय सेवालालचा गजर करीत ढोलताशांच्या निनादात नृत्य करून जयघोष करण्यात आला.