जिल्ह्यातील ५५० औषध विक्रेते होणार संपात सहभागी
By admin | Published: May 29, 2017 01:20 AM2017-05-29T01:20:47+5:302017-05-29T01:20:47+5:30
विविध प्रकारच्या औषध विक्रीवर तत्काळ निर्बंध लादावे, या मुख्य मागणीसाठी येत्या ३० मे रोजी औषध विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बेकायदेशीर आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विविध प्रकारच्या औषध विक्रीवर तत्काळ निर्बंध लादावे, या मुख्य मागणीसाठी येत्या ३० मे रोजी औषध विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील ५५० औषध विक्रेते सहभागी होत असल्याची माहिती केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.
सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बेकायदेशीर आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून नार्कोटिक्स, ड्रग्ज, झोपेचे औषध, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप यासारख्या अनेक धोकादायक औषधींची विक्री केली जात असल्याचे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. मात्र, या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यासह केंद्र शासनाच्या स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पब्लिक नोटिसलाही औषध विक्रेता संघटनेचा विरोध असल्याने ३० मे रोजी हा संप पुकारण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यातील सर्वच अर्थात ५५० औषध विक्रेते या संपात सहभागी होत असून, २९ मे च्या मध्यरात्रीपासून हा संप सुरू होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.