जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ८४ बचतगटांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:44+5:302021-08-18T04:47:44+5:30
वाशिम : ‘आत्मा’ कार्यालय परिसरात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये ‘आत्मा’शी संलग्न ८४ गटांनी सहभाग घेतला. या ठिकाणी ६८ प्रकारच्या रानभाज्या ...
वाशिम : ‘आत्मा’ कार्यालय परिसरात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये ‘आत्मा’शी संलग्न ८४ गटांनी सहभाग घेतला. या ठिकाणी ६८ प्रकारच्या रानभाज्या विक्रीकरता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, साहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा ‘आत्मा’चे प्रभारी प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई म्हणाले, रानभाज्या ही नैसर्गिक संपत्ती आहे. रानभाज्यांचे महत्त्व लोकांना समजावे, या रानभाज्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी गतवर्षीपासून राज्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. शेतकरी गट, महिला बचतगट यांच्या माध्यमातून याकरिता प्रयत्न व्हावेत. विशेषतः महिला शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी प्रास्ताविक केले.
००००
तालुकास्तरावर रानभाजी महोत्सव
जिल्ह्यात ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान तालुकास्तरावर रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गतवर्षी व या वर्षीसुद्धा रानभाजी महोत्सवाला शेतकरी व ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे तोटावार यांनी सांगितले. जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये ‘आत्मा’शी संलग्न ८४ गटांनी सहभाग घेतला. या ठिकाणी ६८ प्रकारच्या रानभाज्या विक्रीकरता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
०००
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान
कोविड-१९ काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वाशिमचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर, कृषी अधिकारी दिलीप कंकाळ, शीतल नागरे, कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे, कृषी साहाय्यक विजयता सूर्य, नितीन उलेमाले, सतीश राऊत, अजय चव्हाण या कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.