वेळ निघून गेल्याने आता गहू पिकाची पेरणी करू नये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 02:08 PM2020-02-03T14:08:42+5:302020-02-03T14:09:11+5:30
वेळ निघून गेल्याने होणारा लागवड खर्च अधिक व त्यापासून मिळणारा नफा कमी राहणार असल्याने आता गव्हाची पेरणी करू नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रब्बी हंगामात गहू हे जिल्ह्यातील मुख्य पिक आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र जवळपास २८ हजार ४१७ हेक्टर असून यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने त्यात वाढ होऊन ३४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला. तथापि, सद्याही काही शेतकरी गहू पिकाची पेरणी करण्याचे नियोजन करित आहेत; मात्र वेळ निघून गेल्याने होणारा लागवड खर्च अधिक व त्यापासून मिळणारा नफा कमी राहणार असल्याने आता गव्हाची पेरणी करू नये. उपलब्ध पाण्याचा जपून वापर करून पुढील पिकांकरिता पाणी राखून ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी केले.
मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणी ही केवळ वैयक्तीक मालमत्ता नसून सार्वजनिक संपत्ती व संसाधन आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. काही पिकांना अल्प प्रमाणात, तर काहींना मोठ्याप्रमाणात पाणी दिले तरच उत्पादन शक्य आहे. त्यानुषंगाने सामजिक दायित्व व बांधिलकीचा सर्वंकष विचार केल्यास उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार गहु या पिकाची उशिरात उशिरा पेरणी १५ डिसेंबरपुर्वीच उरकायला हवी. त्या तारखेनंतर पेरणी करु नये. केल्यास गहू पिकाला पोषक ठरणारे १०० थंडीचे दिवस (७ ते २१ डिग्री तापमान) प्राप्त होत नाही. परिणामी, उत्पादनात घट येते. याऐवजी शेतकºयांनी उन्हाळी तीळ, भूईमुग, मूग यासारख्या पिकांची लागवड केल्यास फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सांगितले.