वाढत्या कोरोना संसर्गामुळे एसटी प्रवासाकडे प्रवाशांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:30 AM2021-02-22T04:30:38+5:302021-02-22T04:30:38+5:30
वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी एसटी महामंडळाचे आगार मात्र चारच आहेत. मंगरुळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड असे हे ...
वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी एसटी महामंडळाचे आगार मात्र चारच आहेत. मंगरुळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड असे हे चार आगार आहेत. या चार आगारांतून पुणे, औरंगाबाद, नागपूर ते मुंबई या महानगराकडे दरदिवशी हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात. कोरोना संसर्गकाळात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली होती, तर लॉकडाऊन काढल्यानंतरही जवळपास दोन महिने एसटीच्या प्रवासीसंख्येला प्रतिसाद न मिळाल्याने एसटी महामंडळ डबघाईस आले होते. त्यानंतर मात्र एसटीच्या प्रवासी वाहतुकीला मोठा प्रतिसाद लाभू लागला. जिल्ह्यात ७ हजारांहून अधिक प्रवासी दरदिवशी एसटीने प्रवास करू लागले. आता मात्र कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रवासीसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात वाशिम जिल्ह्यात गेल्या दोनच दिवसांत प्रवाशांच्या संख्येत जवळपास ४० टक्के घट झाल्याने आगारप्रमुखांना काही फेऱ्या रद्दही कराव्या लागल्या आहेत.
----------------
औरंगाबाद मार्गावर प्रवासीसंख्येत मोठी घट
* वाशिम जिल्ह्यातील चारही आगारांतून नागपूर, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई आदी महानगरांत मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात.
* कोरोना संसर्ग वाढू लागल्याने जवळपासच्या जिल्ह्यांत एसटी प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाला असतानाच औरंगाबाद, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्याचे चित्र आहे. महानगरातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याने या महानगरांत जाण्यास जिल्ह्यातील लोक मागेपुढे पाहत आहेत.
----------------
८ मार्गावर एसटी बंद
* जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गावर एसटीच्या बसफेऱ्या धावत असल्या तरी ग्रामीण भागांतील ८ मार्गावर एसटीच्या बसफेऱ्या बंद आहेत.
* * * * * * *जिल्ह्यातील आगारात बसगाड्यांची संख्या कमी असल्याने उपलब्ध गाड्यांतून नियोजन केले जात असल्याने कमी प्रवासी असलेल्या ८ ग्रामीण मार्गावरील बसफेऱ्या बंद आहेत.
---------------
ना मास्क, ना डिस्टन्सिंग
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तथापि, एसटीचे काही वाहक, चालक आणि अनेक प्रवासी मास्क वापरत नसून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होत नसल्याचे चित्र बसस्थानक आणि एसटीत दिसत आहे.
------------
जिल्ह्यातून एसटीने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या
३२०००
लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या
५०००
एसटी सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या
२००००