वाशिममार्गे पॅसेंजर रेल्वे होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:28+5:302021-07-08T04:27:28+5:30
नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, अकोट आदी शहर परिसरातील नागरिकांना प्रवासाकरिता पॅसेंजरचा मोठा आधार मिळतो. एसटी बसच्या तुलनेत तिकीटदर ...
नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, अकोट आदी शहर परिसरातील नागरिकांना प्रवासाकरिता पॅसेंजरचा मोठा आधार मिळतो. एसटी बसच्या तुलनेत तिकीटदर कमी असल्याने अधिकांश नागरिक पॅसेंजरच्या प्रवासाला पहिली पसंती देतात; मात्र कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ही रेल्वे बंद करण्यात आली. फेब्रुवारी २०२१ पासून आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतही पॅसेंजर सुरू करण्यासंबंधी कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना एसटीच्या प्रवासाशिवाय इतर कुठलाही पर्याय राहिला नाही.
दरम्यान, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता डीआरयूसीसी सदस्य महेंद्रसिंह गुलाटी यांच्यासह युवा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, नंदकिशोर राऊत, आशिष ठाकूर आदींनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांकडे निवेदन सादर करून पॅसेंजर विनाविलंब सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत रेल्वे पूर्ववत सुरू करण्यासंबंधी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही रेल्वे पुन्हा रुळावरून धावायला लागेल, असा आशावाद गुलाटी यांनी व्यक्त केला.
...................
सर्वाधिक प्रतिसाद ‘पॅसेंजर’लाच
वाशिममार्गे नरखेड-काचीगुडा, अमरावती-तिरूपती, हैदराबाद-जयपूर, सिकंदराबाद-जयपूर, गंगानगर-नांदेड आदी एक्स्प्रेस रेल्वे दैनंदिन तथा साप्ताहिक पद्धतीने ये-जा करतात. असे असले तरी त्यास स्थानिक प्रवाशांकडून विशेष प्रतिसाद मिळत नाही. पॅसेंजर रेल्वेला मात्र सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. गत काही महिन्यांपासून ही रेल्वे बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.