प्रवाशांना कोरोनाचा विसर; वाहक-चालकही बेफिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:07+5:302021-08-29T04:39:07+5:30
राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी गेला. या लाटेत लाखो लोकांना संसर्ग झाला आणि अनेकांना लाखो रुपये उपचारावर ...
राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचा बळी गेला. या लाटेत लाखो लोकांना संसर्ग झाला आणि अनेकांना लाखो रुपये उपचारावर खर्च करावे लागले. ही लाट ओसरली असली तरी, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. यासाठी जनतेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने एसटीच्या प्रवासात अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. प्रत्यक्षात अनेक प्रवासी मास्क लावून, फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची दक्षता घेत नसल्याचे, तसेच चालक, वाहकही विनामास्कच कर्तव्य बजावत असल्याचे अमरावती-औसा या बसमधील मंगरूळपीर-वाशिम या एक तासाच्या प्रवासादरम्यान आढळून आले.
--------
बॉक्स :
९० टक्के प्रवासी विनामास्क
कारंजा ते औरंगाबाद ही एसटी बस मंगरूळपीर येथे पोहोचली. त्यावेळी अनेक प्रवासी विनामास्क असल्याचे दिसले, तसेच मंगरूळपीर येथून बसमध्ये चढलेले बहुतांश प्रवासी विनामास्कच होते. या बसमधील जवळपास ९० टक्के प्रवाशांनी मास्क वा रुमाल तोंडावर बांधला नसल्याचे दिसून आले.
.--------
बॉक्स:
चालक-वाहकांनाही मास्क नाहीच
एसटी बसमधील प्रवासी विनामास्क असताना, चालक, वाहकाने तरी खबरदारी बाळगून त्यांना मास्क वापरण्याचे आवाहन करणे अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्षात चालक आणि वाहकच या बसमध्ये विनामास्क असल्याचे दिसून आहे. त्यांनी कोणत्याही प्रवाशाला मास्क लावण्याची वा रुमाल बांधण्याची सूचना केली नाही.
--------