‘ऑक्सिजन बेड’साठी रुग्ण वेटींगवर; जिल्ह्यात प्लांटही नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:08 PM2020-09-20T13:08:26+5:302020-09-20T13:08:36+5:30
अकोला येथील प्लँटच्या भरवशावर राहण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ओढवली आहे.
- संतोष वानखडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा एकही बेड उपलब्ध नाही तसेच सरकारी दवाखान्यातही तुटवडा जाणवत आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही, जिल्ह्यात अद्याप आॅक्सिजन प्लँट नाही. आॅक्सिजनसंदर्भात अकोला येथील प्लँटच्या भरवशावर राहण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ओढवली आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४०० वर पोहचली आहे. सध्या जिल्ह्यात ८२५ अॅक्टिव्ह रुग्ण असून, कोरोनामुळे आतापर्यंत ५७ जणांचा बळी गेला आहे. अतिजोखीम गटातील रुग्णांना आॅक्सिजन सिलिंडरची गरज असून, जिल्ह्यात आॅक्सिजन प्लँट नाही. अकोला येथेही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आॅक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे अकोला येथील प्लँटमधून जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात आॅक्सिजनचा पुरवठाही पूर्वीप्रमाणे होत नसल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजनचा एकही बेड उपलब्ध नसून, या बेडसाठी रुग्ण वेटींगवर असल्याचे दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथेही पूर्वीच्या तुलनेत आॅक्सिजनचा वापर पाचपटीने वाढला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसाला २२ ते २५ सिलिंडर लागत आहेत. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात आॅक्सिजन प्लँट उभारणे आवश्यक ठरत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
अडीच लाख नागरिकांची आरोग्य तपासणी
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा प्रयत्न म्हणून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत अडीच लाखावर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले. कोरोना व्यतिरिक्त अत्यावश्यक व गंभीर आजारी रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आॅक्सिजन सिलिंडर ठेवले जातात, असेही आहेर यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात आॅक्सिजन प्लँट नाही. सध्या अकोला येथून आॅक्सिजनचा पुरवठा होत आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावा यासाठी १० हजार लिटरचा आॅक्सिजन प्लँट प्रस्तावित केला जाईल. यासंदर्भात पाठपुरावा करू.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम