पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस वाहनाला अपघात!
By admin | Published: June 6, 2017 01:05 AM2017-06-06T01:05:52+5:302017-06-06T01:05:52+5:30
तीन जखमी: कारंजाच्या सावरकर चौकातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा: शहर पोलिस स्टेशनच्या पेट्रोलिंगवर असणाऱ्या वाहनाला आयशर ट्रकने गतीरोधक चुकविण्याच्या नादात धडक दिली. या अपघातात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना ४ जूनच्या मध्यरात्री नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील वीर सावरकर चौकात घडली.
औरंगाबादकडून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच ३१ सीक्यू ५१४३ या क्रमांकाच्या आयशर ट्रकने कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या पेट्रोलिंगवर असणाऱ्या एमएच ३७ ए ४२०६ या क्रमांकाच्या पोलिस वाहनाला गतीरोधक चुकविण्याच्या नादात चुकीच्या बाजूला जावून जोरदार धडक दिली. यात पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही. नाचनकर यांचेसह पोलिस वाहन चालक व एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. घटना घडताच ट्रकचा चालक व क्लीनर पसार झाले. दरम्यान मानव सेवा संस्थेचे चमू घटनास्थळी पोहचले व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भांदवि २७९, ३३७, ४२७, १३४ /१८६ व १३९/१० मोटर वाहन कायदयानुसार गुन्हा दखल केला.