घर बांधकाम परवानगीसाठी ४५ हजार रुपये द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:42 AM2021-02-09T04:42:53+5:302021-02-09T04:42:53+5:30
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने जवळपास तीन ते चार महिने घर, दुकानांची बांधकामे प्रभावित झाली होती. ...
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने जवळपास तीन ते चार महिने घर, दुकानांची बांधकामे प्रभावित झाली होती. त्यानंतर बांधकामांना परवानगी मिळाल्याने अनेकजण विविध प्रकारच्या बांधकामांकडे वळले असल्याचे दिसून येते. दुकान किंवा घर बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेची परवानगी बंधनकारक आहे. मंगरूळपीर येथील एका ५३ वर्षीय तक्रारदार इसमाने दुकान व घर बांधकामासाठी परवानगी मिळावी यासाठी नगर परिषदेकडे रीतसर अर्ज सादर केला. रचना सहायक नितेश चौरसिया यांनी दुकान व घर बांधकाम परवानगी देण्याकरिता तक्रारदाराकडे ४५ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर २५ जानेवारी व २७ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी संशयिताने ३५ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे आढळून आले. सापळा कारवाईदरम्यान संशयिताला तक्रारदाराचा संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित २०१८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एन.बी. बोराडे व चमूने पार पाडली.