नजर पैसेवारी ७0 पैसे!

By admin | Published: October 9, 2016 01:48 AM2016-10-09T01:48:15+5:302016-10-09T01:48:15+5:30

वाशिम जिल्हा प्रशासनाने काढलेली खरिप हंगामाची पैसेवारी अन्यायकारक असल्याचा शेतक-यांचा सूर!

Payday 70 penny! | नजर पैसेवारी ७0 पैसे!

नजर पैसेवारी ७0 पैसे!

Next

वाशिम, दि. 0८- चालू खरिप हंगामातील नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची सरासरी पैसेवारी ७0 पैसे काढण्यात आली आहे. दरम्यान, अधिक पावसामुळे हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबिनसोबतच उडीद, मूग या पिकांपासूनही नुकसान झाले असताना शासनाने जाहीर केलेली पैसेवारी अन्यायकारक असल्याचा सूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांमधून उमटत आहे.
जाहीर करण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीमध्ये वाशिम तालुक्याची पैसेवारी ७१ पैसे, मंगरूळपीर तालुक्याची पैसेवारी ७0 पैसे; तर रिसोड, मानोरा मालेगाव आणि कारंजा तालुक्याची पैसेवारी ६९ पैसे दाखविण्यात आली असून जिल्ह्यातील सर्वच ७९३ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
तथापि, वाशिम जिल्ह्यात २0१३ ते २0१५ अशा सलग तीन वर्षांमध्ये शेतकर्‍यांनी मोठा दुष्काळ भोगला. यावर्षी प्रारंभी चांगला पाऊस झाला. मात्र, मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने सोयाबिनची अपेक्षित वाढ झालीच नाही. अशातच ऐन सोंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबिनचे मोठठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
उडिद आणि मूग पिकापासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एकरी केवळ १ ते १.५ क्विंटलचे उत्पन्न मिळाले; तर अधिकच्या पावसामुळे बाधीत झालेल्या सोयाबिनपासून एकरी २ ते ३ क्विंटल उत्पन्न मिळाले तरी खूप होईल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. सोंगणी आटोपल्यानंतर सुड्या मारून ठेवलेले सोयाबिन देखील भिजल्याने त्याची प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे बाजारपेठेत टाकल्यानंतर खराब झालेल्या सोयाबिनला अपेक्षित दर मिळणार नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. असे असताना शासनाने कुठल्या आधारे ५0 पैशांपेक्षा अधिक पैसेवारी काढली, असा प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे.

दुष्काळ निवारण मदतीपासून शेतकरी वंचित
२0१५-१६ मध्ये खरिप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही शेतकर्‍यांना नापिकीचा सामना करावा लागला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने काढलेल्या ४४ पैशाच्या अंतीम पैसेवारीवरून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाला. मात्र, शेतकर्‍यांसाठी जाहीर झालेली दुष्काळ निवारण मदत जिल्ह्यातील एकाही शेतकर्‍याच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. अशातच यावर्षी अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील अधिकांश गावांवर ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने दुष्काळ निवारण मदत विनाविलंब द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

जिल्हा प्रशासन निश्‍चितपणे शेतकर्‍यांच्या सोबतच आहे. सद्या काढण्यात आलेली खरिप हंगाम नजर अंदाज पैसेवारी शेतात उभ्या असलेल्या पिकांच्या आधारावर काढण्यात आली आहे. प्रत्यक्ष हाती आलेल्या उत्पन्नाच्या आधारे अंतीम पैसेवारी काढण्यात येईल. ती अर्थातच उत्पन्न कमी आल्यास कमीच असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी निश्‍चिंत राहावे.
- राहुल व्दिवेदी
जिल्हाधिकारी, वाशिम


शेतकरी म्हणतात-
नजर अंदाज पैसेवारी काढण्याची पद्धत इंग्रजकालीन असून ती शेतकर्‍यांबाबत अन्यायकारक आहे. यावर्षीच्या खरिप हंगामात अधिकच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. लागवड खर्चाच्या तुलनेत अगदीच कमी उत्पन्न मिळणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना जिल्हा प्रशासनाने काढलेली पैसेवारी अत्यंत चुकीची आहे.
- सुभाष देव्हडे, शेतकरी, दुबळवेल

कुठे पावसात प्रदिर्घ खंड; तर कुठे अतवृष्टीसारखी स्थिती उद्भवल्याने खरिप हंगामातील सर्वच पिकांना यंदा जबर फटका बसला आहे. अशा बिकट स्थितीत प्रशासनाने शेतकर्‍यांच्या सोबत असायला हवे. वाशिमचे जिल्हा प्रशासन मात्र शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे.
- सुभाष नानवटे, शेतकरी, दोडकी

Web Title: Payday 70 penny!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.