वीजजोडणी नसतानाही शेतकऱ्याला ३३४० रुपयांचे देयक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:47+5:302021-02-16T04:41:47+5:30
मागील अकरा महिन्यांपासून कोरोना संसर्गाने अनेकांचा रोजगार हिरावला गेला. वीजबिल माफी तर सोडाच; शेतातील विजेचा वापर न करतासुध्दा तालुक्यातील ...
मागील अकरा महिन्यांपासून कोरोना संसर्गाने अनेकांचा रोजगार हिरावला गेला. वीजबिल माफी तर सोडाच; शेतातील विजेचा वापर न करतासुध्दा तालुक्यातील भापूर येथील सदानंद प्रकाश बोडखे यांना चक्क ३३४० रुपयांचे देयक पाठविण्याचा पराक्रम महावितरणच्या रिसोड कार्यालयाने केला आहे. महावितरणकडून घरगुती ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रकमेचे देयक आकारले जात आहे. या घटनेचा निषेध करत महावितरणच्या कार्यालयासमोर विजबिलांची होळी करून काहींनी आंदोलन केले. वीज देयक माफ होणार या चर्चेने परिसरातील अनेकांनी देयकाचा भरणा केलेला नाही. मागील तीन ते चार दिवसांपासून थकीत देयक असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली. दुसरीकडे वीजजोडणी नसतानाही भापूर येथील शेतकऱ्याला ३३४० रुपयांचे देयक आकारले आहे. ग्राहकांकडून काही चूक झाली किंवा देयकाचा भरणा करण्यास विलंब झाला तर दंडात्मक कारवाई करणारे महावितरण आता वीजजोडणी नसतानाही देयक आकारणी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
--
एका वर्षापूर्वी शेतातील वीजजोडणीकरिता रितसर अर्ज केला आहे; परंतु अद्याप जोडणी मिळालेली नाही. महावितरणकडून अचानक ३३४० रुपयांचे देयक आकारण्यात आले. याप्रकरणी न्याय मिळावा आणि चूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी.
सदानंद प्रकाश बोडखे,
शेतकरी, भापूर
---
संबंधित शेतकरी यांना वीजजोडणी मिळालेली नसतानादेखील देयक आकारणी केल्याची तक्रार कार्यालयाला प्राप्त झाली आहे. संबंधित प्रकरणाची रीतसर चौकशी केली जाईल.
- ए.एस.दिवतडे
सहायक अभियंता, महावितरण, शाखा रिसोड