सुटीच्या दिवशीही पीककर्ज वितरणाचे कामकाज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:37 AM2021-04-14T04:37:40+5:302021-04-14T04:37:40+5:30
खरीप हंगामाच्या पेरणीसाठी दरवर्षी विविध बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. यावषीर्ही शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी बँकांमध्ये काम सुरू आहे. ...
खरीप हंगामाच्या पेरणीसाठी दरवर्षी विविध बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. यावषीर्ही शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी बँकांमध्ये काम सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी सेवा सोसायटी महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण केले जाते. तत्पूर्वी मागील कर्जवसुली करून नवीन प्रकरण सेवा सोसायटीमार्फत बँकेत सादर करावी लागते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या त्याअंतर्गत असलेल्या २४ सेवा सोसायटीचे सचिव मंगळवार गुढीपाडव्याच्या सुटीच्या दिवशीही कार्यरत असल्याचे चित्र शिरपूर येथे पाहावयास मिळाले. वाघी बुद्रूक सेवा सोसायटीचे सचिव शंकर ईढोळे व अध्यक्ष नितीन वाघ एकांबा सेवा सोसायटीचे सचिव विजय वढणकर हे शेतकऱ्यांचे खरीप हंगामासाठी पीककर्जासाठी प्रस्ताव तयार करीत आहेत. विविध सेवा सोसायटीच्या माध्यमातून २०२० खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना १८ कोटी ९५ लाखांचे पीककर्ज वितरण करण्यात आले होते. त्यापैकी ९० टक्के म्हणजे जवळपास १७ कोटी रुपये पीककर्जाची वसुली सुद्धा झाली आहे. कोठा सेवा सोसायटीची १०० टक्के कर्जवसुली असून, त्या पाठोपाठ वाघी बुद्रूक येथील ९६ टक्के कर्जवसुली आहे. मागील आठवड्यापासून तिवळी सेवा सोसायटी अंतर्गत शेतकरी सभासदांना पीक कर्जवाटप आला सुरुवात झाली आहे. १५ एप्रिलपासून वाघी बुद्रूक व इतर सेवा सोसायटी अंतर्गत कर्जवाटपाला सुरुवात होणार आहे. नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना शासनाने घोषित केलेला प्रोत्साहनपर देण्यात येणारे पन्नास हजार रुपयांचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. शासनाने ही रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी अपेक्षा वाघी येथील सोसायटीचे अध्यक्ष नितीन वाघ यांनी व्यक्त केली.