पीक विमा काढण्याकडे शेतकरी वर्गाने फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:27+5:302021-07-04T04:27:27+5:30
तालुक्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या खरीप हंगामात परतीच्या अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना ...
तालुक्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या खरीप हंगामात परतीच्या अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसला. सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले. तूर शेतकऱ्यांच्या घरात येईल, अशी अपेक्षा असताना, पुन्हा पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेचे कवच असल्याने शेतकऱ्यांना विमा मिळण्याची अपेक्षा होती. त्यातून काही प्रमाणात का होईना, यावर्षीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना थोडा आधार मिळाला असता. मात्र, याठिकाणीही शेतकऱ्यांची निराशा झाली. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, याकरिता राजकीय पक्षांनी आंदोलनेही केलीत. मात्र, शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपन्यांनी पाने पुसण्याचे काम केले. विमा कंपन्यांनी ऐनवेळी शेतकरी वर्गाला काही अटी व नियम लावत वगळले व स्वतःचा कोटींचा लाभ करून घेतला. त्यामुळे मोठया शेतकरी वर्गाने यावर्षी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरवली आहे.