नदी-नाल्यांवर पूल उभारणीचा प्रश्न प्रलंबित!
By admin | Published: June 27, 2017 09:18 AM2017-06-27T09:18:17+5:302017-06-27T10:24:12+5:30
वाशिम जिल्ह्यातील चित्र : थोड्याथोडक्या पावसानेही उद्भवतेय पूरस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयातून वाहणाऱ्या नद्या व नाल्यांवर पूल उभारण्याचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लागणे आवश्यक होते. असे असतापना त्याकडे लक्ष पुरविल्या गेले नाही. त्यामुळे थोड्याथोडक्या पावसानेही अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातून गेलेल्या १०६.१० किलोमिटरच्या प्रमुख राज्यमार्गावर ४० मोऱ्या आणि रपटे असून २५ लहान आणि दोन मोठे पूल आहेत. यादरम्यान वाहणाऱ्या काटेपूर्णा नदीवरील पुलाची पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक आहे. याशिवाय ४७७.७१ किलोमिटरच्या राज्यमार्गावर ३८९ मोऱ्या आणि रपटे असून ११८ लहान आणि ७ मोठे पूल आहेत. जिल्ह्यातील एकलासपूर गावानजिकच्या पुलावरून पावसाळ्यात पुराचे पाणी जात असल्याने या पुलाची उंची वाढविणे अत्यावश्यक ठरत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा ह्यजैसे थेह्ण आहे. तथापि, तुलनेने रस्ता समांतर झालेल्या छोट्या स्वरूपातील पुलांमुळे पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील नागपूर-औरंगाबाद दृतगती मार्गावरील पूल, जांब या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल, मंगरूळपीर-अनसिंग मार्गावरील पूल, रिसोड ते मेहकर रस्त्यावरील पूल, शिरपूर येथील पूल जमीन समांतर झाल्याने त्यावरून पावसाचे पाणी वाहून पुरपरिस्थिती निर्माण होते. यासह जवळपास ३५ गावांचा तालुकास्थळाशी असलेला संपर्क तुटतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने या महत्वाच्या बाबीकडे लक्ष पुरवून प्रलंबित असलेली पुलांची कामे पूर्ण करावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून जोर धरत आहे.
वाशिम जिल्ह्यातील धोकादायक अवस्थेतील ६६ पुलांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. प्रशासकीय मान्यता आणि शासनाकडून निधी प्राप्त झाल्यास पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली जातील.
- के.आर.गाडेकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम