शिरपूर-खंडाळा वीज उपकेंद्रांतर्गत फिडरची कामे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 04:06 PM2018-10-07T16:06:58+5:302018-10-07T16:07:08+5:30
गावांमधील विद्यूतच्या समस्या ‘जैसे थे’ असण्यासोबतच कृषि फिडरही कार्यान्वित झाले नसल्याने आगामी रब्बी हंगामावर परिणाम जाणवणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन (वाशिम) : येथील आसेगाव रस्त्यावर खंडाळा ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यात आले. मात्र, याअंतर्गत शेलगाव खवणे, वाघी बु. आणि दापुरी खुर्द फिडरची कामे अपुणावस्थेत असून संबंधित गावांमधील विद्यूतच्या समस्या ‘जैसे थे’ असण्यासोबतच कृषि फिडरही कार्यान्वित झाले नसल्याने आगामी रब्बी हंगामावर परिणाम जाणवणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
शिरपूर-खंडाळा ३३/११ केव्ही विद्यूत उपकेंद्राच्या कामाचे भुमिपुजन १७ मे २०१७ रोजी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते झाले होते. तेव्हापासून ७ ते ८ महिन्यात उपकेंद्र उभे राहून त्याअंतर्गत परिसरातील गावांना भेडसावणारी विजेची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याची ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली होती. प्रत्यक्षात मात्र दीड वर्षे होत आली असतानाही विद्यूत उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नाही. परिणामी, शेलगाव खवणे, वाघी बु., दापुरी खर्द या गावांसह मुठ्ठा, दापुरी, ताकतोडा, खंडाळा, बोराळा, कोठा आदी गावांमधील शेतकºयांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कामरगावला दिलेले ट्रान्सफार्मर परत मिळालेच नाही!
खंडाळा वीज उपकेंद्रात कार्यान्वित करण्यासाठी आलेले ५ एम.व्ही.ए.चे ट्रान्सफार्मर १७ सप्टेंबर २०१८ रोजी महावितरणने कामरगाव (ता.कारंजा) येथे हलविले. कृषिपंपांना विद्यूत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले हे ट्रान्सफार्मर पुढील ४ किंवा ५ दिवसांत खंडाळा उपकेंद्रात लावून देवू, अशी ग्वाही महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली होती. मात्र, २० दिवस उलटूनही ट्रान्सफार्मर मिळालेले नाही. यासंबंधी १९ सप्टेंबरला राजकीय पक्ष व शेतकºयांनी मोर्चाही काढला होता; परंतु त्याचा विशेष फायदा झाला नाही.