ग्रामसेवकाच्या बदलीसाठी पिंपळगाववासी सरसावले! पंचायत समितीवर धडकले...
By संतोष वानखडे | Published: September 18, 2023 03:30 PM2023-09-18T15:30:02+5:302023-09-18T15:30:37+5:30
बीडीओंसह सभापतींना निवेदन
संतोष वानखडे, वाशिम : वाशिम तालुक्यातील पिंपळगाव येथे मागील सहा वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या ग्रामसेवकांची अन्यत्र बदली करण्याच्या मागणीसाठी १८ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी वाशिम पंचायत समिती कार्यालय गाठले. गटविकास अधिकाऱ्यांसह (बीडीओ) सभापती, उपसभापतींना निवेदन दिले असून, बदली होणार की नाही? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
गाव विकासात ग्रामपंचायतींचे ग्रामसचिवांची भूमिका महत्वाची ठरते. पिंपळगाव येथील ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसून मागील जवळपास सहा वर्षांपासून ते पिंपळगाव येथे कार्यरत आहेत, असे निवेदनात नमूद आहे. सतत गैरहजर राहत असल्याने गावकऱ्यांची विविध प्रकारची कामे प्रभावित होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. विद्यमान ग्रामसेवकांची अन्यत्र बदली करावी आणि पिंपळगाव येथे दुसरा ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी संतोष आहेर, तुकाराम निरगुडे, नामदेव नरवाडे, नवनाथ निरगुडे, राधेशाम निरगुडे, गंगाधर आहेर यांच्यासह शंभरावर नागरिकांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह सभापती, उपसभापतींकडे केली.
ग्रामसेवकाच्या बदलीबाबत पिंपळगााव येथील नागरिकांचे निवेदन प्राप्त झाले असून, पुढील कार्यवाहीसाठी गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.
- गजानन गोटे, उपसभापती, पंचायत समिती वाशिम