शिधापत्रिकांसाठी जनतेला हेलपाटे; प्रशासन सुस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 02:41 PM2020-02-12T14:41:33+5:302020-02-12T14:41:38+5:30
शेकडो अर्ज निकाली काढून शिधापत्रिका देण्यात प्रशासन दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी अर्जदारांकडून करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात नव्या आणि विभक्त शिधापत्रिकांसाठी जनतेला वारंवार तहसील कार्यालयाच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. विविध योजनांसाठी शिधापत्रिकांची प्रत आवश्यक असल्याने अर्जदार धडपड करीत आहेत. यात विद्यार्थ्यांनाही विविध शैक्षणिक कामकाजासाठी शिधापत्रिकेची प्रत आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले शेकडो अर्ज निकाली काढून शिधापत्रिका देण्यात प्रशासन दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी अर्जदारांकडून करण्यात येत आहेत.
नवीन, तसेच दुबार, विभक्तीकरण शिधापत्रिकांसाठी जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत हजारो लोकांनी सेतू केंद्रांमार्फत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे अर्ज सादर केले आहेतत. त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी नव्या, विभक्त शिधापत्रिकांसाठी पालकांनी केलेल्या अर्जांचाही समावेश आहे. तथापि, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून निर्धारित मुदतीत शिधापत्रिका देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अर्जदारांना उद्या या, वारंवार तहसील कार्यालयाच्या वाºया कराव्या लागत असून, तहसील कार्यालयात गेल्यानंतरही अर्जदारांना प्रशासनाच्या दिरंगाईबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सुरू असलेल्या अर्ज प्रक्रियेकरीता लोकांना शिधापत्रिकांची गरज असून, अनेक कुटूंबांच्या शिधापत्रिकांत बदल करावयाचा किंवा जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांचे नूतनीकरण करावयाचे आहे, तसेच पुढील शैक्षणिक सत्रात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनीही शिधापत्रिकांसाठी अर्ज केले आहेत. तथापि, या संदर्भात घेतलेल्या माहितीनुसार मालेगाव आणि रिसोड तहसील कार्यालय वगळता इतर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असल्याची माहिती मिळाली.
एजंटकडून पैशाच्या मागणीचेही प्रकार
सेतूकेंद्रामार्फत नवीन, विभक्त किंवा दुबार शिधापत्रिकांसाठी अर्ज करणाऱ्यांना शिधापत्रिका मिळण्यास विलंब होत असतानाा तहसील कार्यालय परिसरात कार्यरत एजंट त्यांच्याशी संपर्क साधून शिधापत्रिका तातडीने मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी अर्जदारांकडून नाव उघड न करण्याच्या अटीवर करण्यात येत आहे.
नव्या किंवा विभक्त शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ही कागदपत्रे सादर केली नसतील किंवा अर्जात काही त्रुटी असेल, तर शिधापत्रिका मिळण्यास विलंब लागू शकतो; परंतु जिल्ह्यात अर्जदारांना शिधापत्रिका मिळण्यास विलंब लावण्यात येत असेल, तर त्याबाबत माहिती घेऊन पुरवठा निरीक्षकांच्या बैठकीत जाब विचारून चौकशीही करू.
- राजेंद्रसिंग जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम