चित्रकला गुणांमुळे वाढणार दहावीच्या गुणपत्रिकेतील टक्केवारी !
By Admin | Published: April 5, 2017 01:34 PM2017-04-05T13:34:35+5:302017-04-05T13:34:35+5:30
शासकीय रेखाकला परीक्षेतील ग्रेडनुसार (एलिमेन्ट्री व इंटरमिजिएट) सत्र २०१६ -१७ पासून इयत्ता दहावीच्या परिक्षार्थीला वाढीव गुण मिळणार आहेत.
वाशिम : शासकीय रेखाकला परीक्षेतील ग्रेडनुसार (एलिमेन्ट्री व इंटरमिजिएट) सत्र २०१६ -१७ पासून इयत्ता दहावीच्या परिक्षार्थीला वाढीव गुण मिळणार आहेत. यामुळे रेखाकला परिक्षार्थींच्या दहावीच्या गुणपत्रिकेतील टक्केवारीत वाढ होईल, यात शंका नाही.
कलासंचालनालयामार्फत महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेला (इलिमेन्ट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा) अधिक महत्व प्राप्त झाले आहे. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्यात येणार आहेत. ए ग्रेड साठी १५ गुण, बी ग्रेड साठी १० गुण तर सी ग्रेड साठी ५ गुण यानुसार गुण प्राप्त होणार आहेत. शैक्षणिक वर्ष सन २०१६ -१७ पासून दहावीच्या परीक्षेमध्ये सदर वाढीव गुण दिले जाणार आहेत. ऐनवेळी परीक्षार्थींची धांदल उडू नये म्हणून संबंधित चित्रकला परीक्षार्थींनी या वाढीव गुणाचा लाभ घेण्यासाठी कलाध्यापक अथवा मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र रिसोडचे उपकेंद्र प्रमुख विठ्ठल सरनाईक यांनी केले.