कोरोनातून बरे होणाऱ्यांचा टक्का वाढला; पण मृत्यूसत्र कायम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:45 AM2021-05-25T04:45:53+5:302021-05-25T04:45:53+5:30
वाशिम : गत सात दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांचा टक्का वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे; दुसरीकडे मृत्यूसत्रही कायम ...
वाशिम : गत सात दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांचा टक्का वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे; दुसरीकडे मृत्यूसत्रही कायम असल्याने धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.
देशात साधारणत: मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक होत २६०० रुग्णांची भर पडली होती. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख कमी होत गेला. जानेवारी महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले. कोरोनाचा प्रवास परतीच्या मार्गावर असतानाच, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक झपाट्याने वाढ झाली. दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत होत आहे. वेळीच निदान व उपचार मिळावे याकरिता कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात आला. रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ एप्रिलपासून राज्य शासनाने संचारबंदी लागू केली तर जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून निर्बंध आणखी कठोर केले. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे चांगले परिणाम समोर येत असून, अलीकडच्या काळात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचा टक्का वाढला आहे. १७ मे ते २३ मे या दरम्यान नव्याने २४९४ रुग्ण आढळून आले तर ३५७१ जणांनी कोरोनावर मात केली. ही बाब जिल्हावासीयांसाठी तूर्तास तरी दिलासादायक ठरत आहे. दुसरीकडे मृत्यूसत्र कायम असल्याने धाकधूकही वाढत आहे. गत सात दिवसात ४९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णसंख्येचा आलेख किंचितसा खाली येत असला तरी धोका अजून टळलेला नाही. बेजबाबदार वर्तणूक पुन्हा अंगलट येऊ शकते. त्यामुळे कुणीही गाफील न राहता कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
०००००
अशी आहे सात दिवसातील आकडेवारी
दिनांकनवीन रुग्ण बरे झाले
१७ मे ४१० ४९१
१८ मे ४३७ ४६९
१९ मे २७५ ४७२
२० मे ४०६ ४६७
२१ मे ३८२ ४२८
२२ मे ३१२ ५८८
२३ मे २७० ६५६
एकूण २४९४ ३५७१
००००००००००००
मृत्यूसत्र कायम; सात दिवसात ४९ मृत्यू
एकीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत आहे, कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे मृत्यूसत्र कायम असल्याने चिंताही वाढली आहे. १७ मे ते २३ मे या सात दिवसात ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसाला सरासरी सात मृत्यू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. १७ मे रोजी ३, १८ मे रोजी १, १९ मे रोजी २, २० मे रोजी ७, २१ मे रोजी ९, २२ मे रोजी १४,
२३ मे रोजी १३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.
०००००००००००
प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे
दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. अलीकडच्या काळात रुग्णसंख्येत घट येत असल्याने दुसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, धोका अजून कायम असल्याने नागरिकांनी यापुढेही सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता मास्कचा नियमित वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, हात वारंवार धुणे, या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००००००००