बालसुधारगृहातील अन्नधान्याला लागली कीड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:42+5:302021-08-24T04:45:42+5:30
वाशिम : महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतून येथील बालसुधारगृहात गत महिनाभरापासून मुली नसल्याने अन्नधान्याला कीड लागल्याचा प्रकार सोमवारी ...
वाशिम : महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतून येथील बालसुधारगृहात गत महिनाभरापासून मुली नसल्याने अन्नधान्याला कीड लागल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. धान्य बदलून त्वरित नवीन धान्य घ्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
वाशिमच्या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांच्याकडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त प्रभार आला असून, प्रभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आकस्मिक भेटीची मोहीम हाती घेतली. २३ ऑगस्ट रोजी वाशिम येथील दिशा बालसुधार व निरीक्षणगृहाची पाहणी केली. यावेळी मुलींना पुरविण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा व अन्नधान्यांची तपासणी केली. सध्या महिनाभरापासून सुधारगृहात मुली नसल्याने अन्नधान्यास कीड लागल्याचे आढळून आले. कीड लागलेले धान्य त्वरित बदलून नवीन धान्य भरावे अशी सक्त ताकीद देण्यात आली. यावेळी परिवीक्षा अधिकारी गणेश ठाकरे आणि कनिष्ठ सहाय्यक विजय वाकूडकर उपस्थित होते.
०००
आठ प्रकरणांत परस्पर सामंजस्य!
वाशिम शहरातील समुपदेशन केंद्राला भेट दिली असता, सरासरी दहापैकी आठ प्रकरणांत समुपदेशनमुळे परस्पर सामंजस्याने सलोखा होत असल्याचे दिसून आले.