वाशिम जिल्हयात जमावबंदी आदेश लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:17 PM2021-02-18T12:17:01+5:302021-02-18T12:18:30+5:30
Phohibition Order in Washim District पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत.
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले असून, पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात १७ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्रीपासून जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष शण्मुगराजन एस. यांनी बुधवारी जारी केला.
या आदेशानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका याठिकाणी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी राहील. पुढील आदेशापर्यंत मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही. याबाबत स्थानिक प्रशासन यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यांचे स्तरावरून गर्दीस प्रतिबंध करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. या कालावधीत आॅनलाईन, दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहणार आहे.
कोरोना बाधितांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी
कोरोना बाधितांचा लवकर शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवल्यास हा संसर्ग वाढणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्व तहसीलदारांनी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करावे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तींची चाचणी होणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लग्न समारंभात ५० व्यक्तींनाचीच उपस्थिती
लग्न समारंभाकरिता केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थिरत राहता येणार आहे. लग्न समारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असेल. अनुज्ञेय संख्येपेक्षा जास्त संख्येने समारंभासाठी व्यक्ती उपस्थित राहिल्याचे निदर्शनास आल्यास मंगल कार्यालय चालकाविरुद्ध पहिल्या वेळी ५००० रुपये दंड आकारण्यात येईल, दुसऱ्या वेळी अशीच बाब निदर्शनास आल्यास सदरचे मंगल कार्यालय १५ दिवस बंद करण्यात येईल.