कृषी आयुक्तालयाने मागविली पीक नुकसानाची छायाचित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 02:29 PM2019-12-13T14:29:55+5:302019-12-13T14:30:01+5:30
छायाचित्रांच्या निरीक्षणानंतरच कृषी आयुक्तालयाकडून केंद्र शासनाकडे नुकसानाचा अंतिम अहवाल पाठविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांंना भरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने एक सर्वकष अहवाल तयार करून कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला. याअहवालाची पडताळणी सुरू असतानाच जिल्ह्यातील सर्व पीकविमाधारकांच्या नुकसानाची छायाचित्रे मागविण्यात आली असून, या छायाचित्रांच्या निरीक्षणानंतरच कृषी आयुक्तालयाकडून केंद्र शासनाकडे नुकसानाचा अंतिम अहवाल पाठविला जाणार आहे.
जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या. प्रत्यक्षात जिल्ह्यात २ लाख ९६ हजार १२५ शेतकºयांनी २ लाख ४ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा उतरविला होता. त्यातील १ लाख ५२ हजार १९४ शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले. या अर्जानुसार प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही केले. यानुसार पीक विमा काढणाºया शेतकºयांपैकी ६५ हजार ५४८ शेतकºयांच्या २८ हजार २६७ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील उभ्या पिकांचे, तर १ लाख ३७ हजार ८५२ शेतकºयांच्या १ लाख ४३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रातील काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. अर्थात पीक विमा काढणाºया एकूण २ लाख ३ हजार ४०० शेतकºयांच्या १ लाख ७२ हजार ६५ पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना पीकविम्याच्या निकषानुसार मदत देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने एक सर्वकष अहवाल तयार करून तो कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला. या अहवालात बाधित शेतकºयांची नावे, गावे, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करण्यात आली आहे. तथापि, या अहवालाची पडताळणी सुरू असतानाच आता कृषी आयुक्तालयाने पीकविमाधारक शेतकºयांच्या नुकसानाची प्रशासनाने काढलेली छायाचित्रे मागविली आहेत. अर्थात आता कृषी विभागाला २ लाख ३ हजार ४०० शेतकºयांच्या शेतातील नुकसानाची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे पाठवावी लागत आहेत. कृषी विभागाकडून ही छायाचित्रे पाठविण्यातही येत आहेत.
(प्रतिनिधी)
शेतकºयाच्या नावासह छायाचित्राची होणार पडताळणी
जिल्ह्यात आॅक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे उभ्या आणि काढणी पश्चात पिकांचे जे नुकसान झाले. त्याचा सचित्र अहवाल तयार करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर केंद्रीय पथकानेही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर कृषी विभागाने पीकविमाधारकांच्या नुकसानाचा अहवालही कृषी आयुक्तालयाकडे पाठविला. आता या अहवालासोबत प्रत्यक्ष शेतकºयाचे नाव असलेले नुकसानाचे छायाचित्र मागविण्यात आले असून, अहवालानुसार शेतकºयाच्या नावासह छायिाचत्रातील नुकसानाची पडताळणी कृषी आयुक्तालयाकडून करण्यात येणार आहे.
पीकविमाधारक शेतकºयांच्या नुकसानाचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आल्यानंतर आता नुकसानाची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे त्यांच्याकडून मागविण्यात आली आहेत. अहवालानुसार शेतकºयांचे नुकसान दर्शविणाºया छायाचित्रांची पडताळणी त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.
-एस. एम. तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम