रात्री उशिरापर्यंत केले जातेय छायाचित्र अपलोड करण्याचे काम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:01 PM2018-03-30T15:01:57+5:302018-03-30T15:01:57+5:30
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे तसेच आर्थिक माहिती भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले जात असल्याचे २९ मार्च रोजी दिसून आले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे तसेच आर्थिक माहिती भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले जात असल्याचे २९ मार्च रोजी दिसून आले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
वाशिम जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर ३१ मार्चपूर्वी अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच आर्थिक माहितीदेखील भरावी लागत आहे. ही मोहिम पुर्णत्वाकडे नेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी आढावा घेत ३१ मार्चपूर्वी छायाचित्र अपलोड करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा दिला. जिल्हा स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे व चमूने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना देत शौचालय बांधकामाचे छायाचित्र अपलोड करण्याचे आवाहन केले. त्या अनुषंगाने रात्री उशिरापर्यंत छायाचित्र अपलोड करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. कारंजा तालुक्यात छायाचित्र अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मानोरा, रिसोड व वाशिम तालुक्यातही छायाचित्र अपलोड करण्याचे व आर्थिक माहिती भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. पाच दिवसांपूर्वी पिछाडीवर असलेल्या मंगरूळपीर तालुक्याने आता वेग पकडला असून, आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले. ३१ मार्चपर्यंत १०० टक्के काम पूर्ण करण्याची कसरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. मालेगाव तालुका पिछाडीवर असून, जिल्हा परिषद प्रशासनाने मालेगाव तालुक्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते.