तरुणांचा शारीरिक आणि बौद्धिक सरावही क्रीडांगणावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 03:40 PM2018-12-09T15:40:13+5:302018-12-09T15:40:54+5:30
अनेक तरुण, तरुणी क्रींडागणावरच शारीरिक आणि बौद्धिक सराव करीत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुका क्रीडा संकुलावर पाहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विविध स्पर्धा परिक्षांत यशस्वी होण्यासाठी सुशिक्षीत तरुण, तरुणींची मोठी धडपड सुरू आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षण उपयोगी पडावा म्हणून अनेक तरुण, तरुणी क्रींडागणावरच शारीरिक आणि बौद्धिक सराव करीत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुका क्रीडा संकुलावर पाहायला मिळत आहे.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या काळात स्वत:ला सिद्ध करून अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्येकाला मोठी धडपड करावी लागत आहे. स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी युवकांची मोठी कसोटी लागत आहे. महाविद्यालयात तासिका आटोपल्यानंतर फावल्या वेळेत वर्गमित्रांशी अभ्यासविषयक चर्चा करणे, वर्ग आटोपला की, घरी बॅग टाकून लगेच शिकवणी वर्गाला जाणे आणि नंतर उरलेल्या वेळेत स्वत:ची महत्त्वाची कामे आटोपून लगेच अभ्यासाला भिडणे, हा बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जणू जीवनक्रमच ठरत आहे. एवढे करून स्वत:ला स्पर्धेत टिकविण्यासाठी सदृढ राहणे, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शेकडो सुशिक्षीत युवकही याला अपवाद नाहीत. तालुक्यातील बरेच युवक शहराच्या मध्यभागी असलेल्या तालुका क्रीडा संकुलावर शारीरिक सरावासाठी सकाळ, संध्याकाळ नियमित येतात. शारीरिक सराव आटोपल्यानंतर वेळ व्यर्थ खर्च होऊ नये म्हणून अनेक तरुण, तरुणी क्रीडांगणावरच स्पर्धा परिक्षेचा अभ्यासही करतात. गेल्या अनेक दिवसांपासून हा त्यांचा क्रम सुरूच आहे.