नळयोजनेद्वारा होणारा पाणीपुरवठा पून्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:31+5:302021-07-07T04:51:31+5:30
काजळेश्वर उपाध्ये : महावितरणने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटरची व ग्रामपंचायत भवनाचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावात नळयाेजनेव्दारा पाणी पुरवठा ...
काजळेश्वर उपाध्ये : महावितरणने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटरची व ग्रामपंचायत भवनाचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावात नळयाेजनेव्दारा पाणी पुरवठा पुन्हा बंद पडला आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
काजळेश्वर ग्रामपंचायतीकडे महावितरणचे साडेआठ लाख रुपये थकीत असल्याने वीज पुरवठा कापण्यात आला आहे. काजळेश्वर ग्रामवासीयांना नळयोजनेद्वारा ग्रामपंचायत घरोघरी पाणीपुरवठा करते. मात्र, गत सात दिवसांपूर्वी महावितरणने थकीत बिलामुळे २९ जूनपासून सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत असल्याचे चित्र आहे. मागे तीन महिन्यांपूर्वी अंशत: बिल ग्रामपंचायतीने भरल्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाला होता. मात्र, मोठी थकबाकी असल्याने पुन्हा महावितरण कारंजाने काजळेश्वर ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला. तेव्हा गावकऱ्यांची पाणी समस्या ग्रामपंचायत प्रशासन, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव डोंगरदिवे, पंचायत समिती सदस्य रंगराव धुर्वे यांच्यासह गावातील समाजसेवी मंडळीनी पुढाकार घेऊन सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थ तथा प्रहार जनशक्तीच्या सेवकांनी केली आहे. ग्रामपंचायतीने थकीत रक्कम भरून ग्रामस्थांची हाेणारी गैरसाेय थांबिवण्याची मागणी हाेत आहे.
...........
सात दिवसांपासून नळ योजना बंद
सात दिवसांपासून नळ योजना बंद असल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. पाण्याचे स्रोत गावात पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. शेतकरी, शेतमजूर यांचे सध्या शेतीकामाचे दिवस आहेत. शेतातील विहिरीवरून किंवा काही ग्रामस्थांच्या खासगी बोअरवेल आहेत, तेथून महिलांना पाणी आणावे लागत आहे.
...........
गावकऱ्यांकडे ५२ लाख ५० हजार रुपये घरटॅक्स व पाणी कर थकीत आहे . तेव्हा ग्रामस्थांना विनंती आहे की, त्यांनी आपल्याकडील थकबाकी ग्रामपंचायतीकडे भरावी व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
पुंडलीकराव देशमुख,
प्रशासक ग्रामपंचायत, काजळेश्वर
...........
गावात ६१६ घरगुती नळ कनेक्शन ग्रामपंचायतीने दिली आहेत. मासिक ३० रुपये याप्रमाणे पाणीकर आकारला जातो. ग्रामस्थांनी तो नियमित ग्रामपंचायतीला दिला, तर पाणी समस्या निकाली निघेल. तेव्हा ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी विनंती आहे.
सतीश वर्घट
ग्रामविकास अधिकारी, काजळेश्वर