केबल टाकताना फुटली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 06:23 PM2019-03-20T18:23:22+5:302019-03-20T18:23:55+5:30
वाशिम : परराज्यातील ‘जेसीबी’व्दारे भुमिगत ‘केबल’ टाकण्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : परराज्यातील ‘जेसीबी’व्दारे भुमिगत ‘केबल’ टाकण्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. दरम्यान, ‘जेसीबी’वर असलेल्या मजूरांना मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषा कळत नसल्याने नेमक्या कुठल्या कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे, याचा पत्ता लागत नसल्याने कारवाई करताना अडचण निर्माण झाली आहे. याप्रकरणी जऊळका पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के. जीवने यांनी दिली.
वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सद्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ताब्यात आहेत. याअंतर्गत १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, कुठल्यातरी कंपनीने भुमिगत ‘आॅप्टीकल फायबर केबल’ टाकत असताना ते चक्क पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमधून टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे ठिकठिकाणी पाईपलाईन फुटल्याने संबंधित चौदाही गावांना होणारा पाणीपुरवठा प्रभावित झाला. यामुळे गावकºयांना कृत्रीम तथा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पाईपलाईल फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जीवने यांच्यासह त्यांच्या चमुने बाधीत झालेल्या ठिकाणांना भेटी देवून पाईपलाईन जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बºयाच लांबपर्यंत पाईपलाईन फुटलेली असल्याने संपूर्ण दुरूस्ती करण्यास बराच कालावधी लागणार असल्याचे जीवने यांनी सांगितले.
‘जेसीबी’ मालकाचाही पत्ता लागेना!
पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फोडून १४ गावांचा पाणीपुरवठा प्रभावित करण्यास कारणीभूत ठरलेल्या कंपनीसोबतच ‘जेसीबी’च्या मालकाचाही पत्ता लागेनासा झाला आहे. ‘जेसीबी’वर असलेल्या एच. ३० एझेड ००९८ या क्रमांकाची आॅनलाईन चौकशी केल्यानंतर ‘डिटेल्स नॉट फाऊंड’चा संदेश येत असल्याचे मजिप्राचे कार्यकारी अभियंता के.के. जीवने यांनी सांगितले. त्यामुळे हा जेसीबी नेमका कुणाचा, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अद्याप पत्ता न लागलेल्या कंपनीच्या ‘जेसीबी’ने बेकायदेशीररित्या खोदकाम करून पाणीपुरवठा योजनांची पाईपलाईन फोडले. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याप्रकरणी जऊळका पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून दोषी कंपनीचा शोध घेणे सुरू आहे. संबंधित गावांमधील नागरिकांनीही याकामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- के.के. जीवने, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वाशिम