तालुकानिहाय प्रत्येकी ३०० कोरोना चाचण्यांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 11:30 AM2021-07-15T11:30:15+5:302021-07-15T11:30:21+5:30
Washim News : यापुढे प्रत्येक तालुक्यात दैनंदिन ३०० कोरोना चाचण्यांचे नियोजन आहे.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दुसरी लाट ओसरत असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. मध्यंतरी चाचण्यांची संख्या घटली होती. खबरदारी म्हणून यापुढे प्रत्येक तालुक्यात दैनंदिन ३०० कोरोना चाचण्यांचे नियोजन आहे.
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८९३४ होती. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत आहे. जून महिन्यात १३५१ रुग्ण आढळून आले.
जुलै महिन्यात १४ दिवसांत १६६ रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात दैनंदिन सरासरी १४३१, एप्रिलमध्ये १२९५, तर मेमध्ये २२६५ चाचण्या झाल्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने चाचण्यांची संख्यादेखील कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने गाफील राहून चालणार नाही, या भूमिकेतून जिल्हा प्रशासनाने दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. त्यानुसार तालुकानिहाय दैनंदिन ३०० याप्रमाणे जिल्ह्यात १८०० कोरोना चाचण्यांचे नियोजन आरोग्य विभागातर्फे सुरू आहे. नागरिकांनीदेखील सर्दी, ताप किंवा खोकला, घसा खवखवणे आदी लक्षणे दिसताच नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करणे अपेक्षित आहे.
दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तालुकानिहाय दैनंदिन ३०० कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार नियोजन केले जात असून, नागरिकांनीदेखील लक्षणे दिसून येताच चाचणी करावी.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम