जुलैपासून नववी ते बारावीची शाळा सुरू करण्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 04:41 PM2020-06-17T16:41:19+5:302020-06-17T16:41:45+5:30
शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे.
वाशिम : कोरोनामुक्त असलेल्या क्षेत्रात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन केले जात असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वनियोजन म्हणून मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतींकडून विहित नमुन्यात जिल्हा परिषद प्रशासनाने माहिती मागविली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून शाळा बंद आहेत. विदर्भात २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरूवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा केव्हा सुरू होतील, याचे निश्चित वेळापत्रक नाही. दुसरीकडे कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे.
कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, याची खात्री करूनच शासनाने ठरवून दिलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे नियोजन जिल्हास्तरावर केले जात आहे. त्यानुसार नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून, सहावी ते आठवीचे वर्ग आॅगस्टपासून तर तिसरे ते पाचवीचे वर्ग सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिली ते दुसरीच्या वर्गााबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. टिव्ही, रेडीओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी, ऐकविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करण्याची जबाबादारीही शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर अकरावीचा वर्ग सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर ग्राम पंचायत किंवा नगर परिषद, नगर पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, कोविड ग्रामस्तरीय समिती, शिक्षण तज्ज्ञ, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींशी चर्चाविनिमय करूनच निर्णय घेतला जाणार आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.