एकाच दिवशी ७५ हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचे नियोजन; शासकीय योजनांची जत्रा उपक्रम
By संतोष वानखडे | Published: April 12, 2023 01:32 PM2023-04-12T13:32:27+5:302023-04-12T13:32:54+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वतयारीचा आढावा
वाशिम- एप्रिल किंवा मे महिन्यात जिल्हयात आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची जत्रा उपक्रमातून जिल्हयात ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच दिवशी योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले असून, त्याअनुषंगाने पूर्वतयारीचा आढावाही घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पार पडलेल्या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी मिन्नु पी.एम., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन म्हणाले, लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी तत्पर असायला हवे. संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यायासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्याची पुर्तता लाभार्थ्यांकडून करुन घ्यावी. कोणत्याही गरजू लाभार्थ्याचा अर्ज नामंजूर केला जाणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविला जाणार असून, जिल्हयातील शेवटच्या गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. प्रत्येक यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग राहणार आहे. यंत्रणेने या जत्रेच्या दृष्टीने काम करीत असलेल्या कामांचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षाला दररोज सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. यावेळी शैलेश हिंगे यांनी शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाची माहिती दिली.