वृक्षारोपण व संवर्धनासाठी जिल्हयातील सरपंचांचा आगळा-वेगळा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 06:25 PM2019-07-13T18:25:37+5:302019-07-13T18:25:53+5:30
वृक्षारोपण महत्वाचे असल्याचे जाणून जिल्हयातील अनेक सरपंचांनी आगळा-वेगळा उपक्रम राबवून मोठया प्रमाणात आपआपल्या गावात वृक्षारोपण करुन घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याासाठी वृक्षारोपण महत्वाचे असल्याचे जाणून जिल्हयातील अनेक सरपंचांनी आगळा-वेगळा उपक्रम राबवून मोठया प्रमाणात आपआपल्या गावात वृक्षारोपण करुन घेतले. तसेच त्याचे संवर्धन व्हावे यासाठी सुध्दा नविन युक्ती लढविल्याने लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन होईल याबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील टनका येथील सरपंच शरद गोदारा, कारंजा तालुक्यातील पिंपळगाव सरपंच दादाराव बहुटे, हिवरा लाहे येथील सरपंच सागर डेरे यांचा समावेश आहे.
कारंजा तालुक्यातील पिंपळगाव बु. येथील सरपंचांनी शासनाचा वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पुढाकार घेतला असून ग्रामस्थांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने पाच झाडे लावून त्या झाडांचे पाच वर्ष संवर्धन व संगोपन केल्यास पाच वषार्ची घरपट्टी माफ केल्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतांना ग्रामपंचायतचे नुकसान होवू नये याकरिता त्यांनी ही घरपट्टी स्वता भरणार असल्याचे सांगितले. तसेच कारंजा तालुक्यातीलच हिवरा लाहे येथील सरपंच सागर डेरे यांनी सुध्दा याच प्रकारचा निर्णय घेवून शासनाच्या वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले. वाशिम तालुक्यातील टनका येथील सरपंच शरद गोदारा यांनी सुध्दा आगळी-वेगळी संकल्पना लढवून वृक्ष लागवडीसाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी तर चक्क वृक्ष लावल्याचा पुरावा दाखवा व नंतरच दाखला देण्याचा उपक्रम जिल्हयात चांगलाच चर्चेचा राहिला. या सर्व सरपंचाच्या कार्याचे कौतूक होत आहे.