वाढदिवसाचा खर्च टाळून स्मशानभूमीत १६० वृक्षांची लागवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:55+5:302021-08-25T04:45:55+5:30
वाशिम : आपल्या वाढदिवशी कोणताही अनाठायी खर्च न करता पर्यावरण संवर्धनात हातभार लावण्याच्या हेतूने दोनद बु. चे सरपंच निरंजन ...
वाशिम : आपल्या वाढदिवशी कोणताही अनाठायी खर्च न करता पर्यावरण संवर्धनात हातभार लावण्याच्या हेतूने दोनद बु. चे सरपंच निरंजन करडे यांनी गावातील स्मशानभूमी परिसरात १६० वृक्षांची लागवड करून ते जगविण्याचा संकल्प करीत, इतर गावच्या सरपंचासमोर आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमासाठी त्यांना गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.
मागील काही वर्षात दिल्ली ते गल्लीपर्यंत लोकप्रतिनिधींचे वाढदिवस जल्लोषात साजरे करण्याचे प्रस्थच माजले आहे. लोकप्रतिनिधीचा वाढदिवस म्हटला की त्यांचे समर्थक विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात, जागोजागी शुभेच्छा फलक लावतात. स्वत: लोकप्रतिनिधीही कार्यक्रम, मेजवाणीचे आयोजन करून वाढदिवसात मोठा खर्च करतात. काही लोकप्रतिनिधी मात्र याला अपवाद आहेत. कारंजा तालुक्यातील दोनद बु. चे सरपंच निरंजन करडे हे त्यापैकीच एक. दोनद बु. हे गाव समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी आहे. त्यामुळे या गावांत तसेही विविध पर्यावरणविषयक उपक्रम राबविले जात आहेत. त्यातच निरंजन करडे हे नेहमीच पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबवतात. यात आणखी एक समाजोपयोगी उपक्रम राबविताना त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून स्मशानभूमी परिसरात १६० वृक्षांची लागवड करीत पर्यावरण संवर्धनात हातभार लावतानाच इतर सरपंचासमोर आदर्श निर्माण केला आहे. यासाठी त्यांना गावातील पुरुष, महिला मंडळीचे सहकार्य लाभले.
---------------------------
लागवड केलेल्या वृक्षांचे उमेदच्या सदस्यांकडून रक्षाबंधन
दाेनद बु.चे सरपंच निरंजन करडे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून १६० वृक्षांची लागवड करीत स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेतला, तर त्यांच्या उपक्रमाला सहकार्य म्हणून उमेदच्या महिलांनी लागवड केलेल्या वृक्षांना राख्या बांधून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. निरंजन करडे यांनीही या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.