वाशिम जिल्ह्यात साडेचार लाख वृक्षांची लागवड
By admin | Published: July 8, 2017 01:37 AM2017-07-08T01:37:24+5:302017-07-08T01:37:24+5:30
विविध शसकीय विभाग व संघटनांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत सामाजिक वनीकरणसह वन विभागाशी निगडित कार्यालयांना ७ जुलैपर्यंत १ लाख ८९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असताना, त्यांच्याकडून ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण २ लाख ६ हजार ७५० वृक्षांची लागवड केली. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या १०९.३० टक्के आहे. सामाजिक वनीकरण व वन विभाग सोडून इतर विभागांनीही त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ८१.४३ टक्के वृक्ष लागवड केली आहे. जिल्ह्यात ७ जुलैच्या सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ४ लाख ६६ हजार ९१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेला जिल्ह्यातील विविध शासकीय विभागासह शाळा, महाविद्यालये, सामाजिक , स्वयंसेवी संस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शासनाच्या मोहिमेत सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या विविध शाखांसाठी १ लाख ८९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यांच्याकडून या वृक्ष लागवडीसाठी विविध स्थळांची निवड करून, २ लाख २७ हजार ८१० खड्डे खोदण्यात आले आणि त्यापैकी २ लाख ६ हजार ७५० खड्ड्यांत ७ जुलै २०१७ च्या सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २ लाख ६ हजार ७५० वृक्ष लावण्यात आले. हे प्रमाण निर्धारित वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या १०९.३९ टक्के आहे. सामाजिक वनीकरणसह वन विभागाच्या विविध शाखा सोडून जिल्हाधिकारी वाशिम यांनी जिल्ह्यातील इतर विभागांसाठी ३ लाख १८ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यासाठी ३ लाख ५१ हजार १८९ खड्डे खोदण्यात आले. यातील २ लाख ५९ हजार ३४१ खड्ड्यांत वृक्ष लावण्यात आले. हे प्रमाण जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वृक्ष लागवड उद्दिष्टाच्या ८१.४३ टक्के आहे. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत ८ जुलै रोजी वन विभागाकडून अद्ययावत होणाऱ्या आकडेवारीत हे प्रमाण निश्चित शंभर टक्क्यांच्यावर असेल, असा विश्वास अधिकारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आला आहे.