जिल्ह्यात पाच लाख वृक्षांचे रोपण!
By admin | Published: June 29, 2017 01:23 AM2017-06-29T01:23:41+5:302017-06-29T01:23:41+5:30
कार्यालयीन वेळेत सूट : वृक्षारोपणाची तयारी पूर्णत्वाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात यावर्षी ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. वृक्षारोपणात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी १ जुलै रोजी कार्यालयीन वेळेत विशेष सूट दिली जाणार आहे. वृक्षारोपणाचे छायाचित्र सादर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत कार्यालयात जाता येणार आहे.
राज्यात एकाच दिवशी १ जुलै रोजी किमान चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जाणार आहे. वन विभागातर्फे २.२५ कोटी आणि शासनाच्या इतर २९ विभागांतर्फे ७५ लाख व ग्रामपंचायतींतर्फे एक कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात पाच लाख आठ हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्षारोपण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेत शासकीय व निमशासकीय संस्था, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शासनातर्फे व जिल्हा प्रशासनातर्फे यापूर्वी करण्यात आले. १ जुलै रोजी साधारणत: सकाळी ९ वाजेपासून वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहभाग नोंदविता यावा, यासाठी शासनाने कार्यालयीन वेळेत सूट दिली आहे. सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत सोयीच्या वेळेत व सोयीच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ जुलै रोजी दुपारी १ वाजेपर्यंत कार्यालयात उशिरा येण्यासाठी सवलत मंजूर करण्यात आलेली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात स्वत: वृक्षारोपण करणे, स्वयंसेवक म्हणून वृक्षारोपण कामात सहभाग घेणे, लोकांना वृक्षारोपणासाठी प्रवृत्त करणे, शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवडीच्या कामात जी मदत करता येईल, त्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन मदत करणे, लोकसहभाग मिळविणे आदी कामे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडणे अपेक्षित आहे. या सवलतीचा लाभ घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृक्षारोपण करतानाचे छायाचित्र पाठविणे बंधनकारक आहे. या निर्णयानुसार, जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेता यावा, यासाठी कार्यालयीन वेळेत सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.