शास्त्रशुद्ध पद्धतीने पेरणी केल्यास लागवड खर्चात बचत शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:47+5:302021-05-11T04:43:47+5:30
खरीप हंगामात पारंपरिक पद्धतीने बैलजोडीद्वारे पेरणी केल्यास साधारणत: एकरी २० हजार ४०० रुपये लागवड खर्च येतो. त्या तुलनेत सरासरी ...
खरीप हंगामात पारंपरिक पद्धतीने बैलजोडीद्वारे पेरणी केल्यास साधारणत: एकरी २० हजार ४०० रुपये लागवड खर्च येतो. त्या तुलनेत सरासरी ८ क्विंटल उत्पन्न गृहीत धरल्यास आणि ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्यास खर्च वजा जाता ११ हजार ६०० रुपये निव्वळ उत्पन्न हाती पडते. ट्रॅक्टरचलित साध्या पेरणी यंत्राद्वारे पेरणी केल्यास एकरी २० हजार लागवड खर्च येऊन १७ हजार ९०० रुपये निव्वळ उत्पन्न मिळू शकते, तसेच ट्रॅक्टरचलित बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी केल्यास एकरी १२ क्विंटल उत्पन्न हाती पडून १९ हजार ९२० रुपये एकरी लागवड खर्च व ३३ हजार ९४० रुपये निव्वळ उत्पन्न मिळणे शक्य आहे, तर बैलजोडीद्वारे सरी वरंबा काढून टोकन पद्धतीने सोयाबीन पेरणी केल्यास एकरी तब्बल १४ क्विंटल उत्पन्न काढणे शक्य असून, केवळ १४ हजार ९०० रुपये लागवड खर्च येतो. यामुळे एकरी निव्वळ उत्पन्न ४१ हजार १०० रुपये शेतकऱ्यांना मिळणे शक्य असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली. सोयाबीन पेरणीचे हे अर्थशास्त्र त्यांनी जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पटवून देणे सुरू केले आहे. त्याचा अपेक्षित फायदाही होत असून, अधिकांश शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात ट्रॅक्टरचलित बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे किंवा बैलजोडीद्वारे सरी वरंबा काढून टोकन पद्धतीने सोयाबीन पेरणी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, विविध कंपन्यांकडून खरेदी करण्यात येत असलेले सोयाबीन बियाणे बोगस निघून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची उदाहरणे यापूर्वी घडली आहेत. या धर्तीवर शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात शास्त्रशुद्ध पद्धतीने घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून हेच बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
.....................................
कोट :
खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. जिल्ह्यात अधिकांश क्षेत्रावर सोयाबीनचाच पेरा होत असल्याने, अधिक उत्पन्न कसे काढता येईल आणि नुकसानीपासून बचाव कसा करता येईल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे सुरू आहे. कृषी विभागाची चमू या कामी प्रत्येक तालुक्यात उत्तम कार्य करीत आहे.
- शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम