जिल्ह्यात होणार विविध वृक्षांच्या रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:33+5:302021-05-20T04:44:33+5:30
कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी अमित शिंदे, मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे, प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे व प्राध्यापक बापुराव डोंगरे ...
कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी अमित शिंदे, मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे, प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे व प्राध्यापक बापुराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयोचे आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने १५ दिवसांपूर्वी माळशेलू येथील रोपवनाला लागलेली आग विझवून तब्बल २५ ते ३० एकर रोपवन जळण्यापासून वाचविले होते. आता या रोपवनाला पुन्हा हिरवे करण्यासाठी साळुंकाबाई राऊत महाविद्यालय, वनोजा रासेयोच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. वनविभागाच्या सहकार्याने या जळालेल्या रोपवनाला सिड्सबाॅल व रोपे लावून ते हिरवे करण्याचा विडा या पथकाच्या सदस्यांनी उचलला आहे. पथकाच्या सदस्यांनी विविध वृक्षांच्या तब्बल ७ ते ८ हजार बिया प्रादेशिक वनविभागाकडे सुपुर्द केल्या. तसेच लवकरच अतिदुर्मीळ पिवळा गुलमोहर यांच्या बियासुद्धा वनविभागाला रोपे तयार करण्यासाठी देण्यात येणार आहे. तसेच याव्यतिरिक्त लवकरच विविध वृक्षांच्या बियांचे हजारो सिड्सबाॅल तयार करून ते विरळ जंगलात टाकण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पथकाच्या मंगरूळपीर येथील सदस्या गायत्री पेंढारकर, कल्याणी पेंढारकर तसेच सदस्य अनिकेत इंगळे, सतीश गावंडे, बुद्धभूषण सुर्वे, सौरव इंगोले, ओम वानखडे, प्रदीप सावळे, राहुल साखरे व सचिन राठोड, आदित्य इंगोले परिश्रम घेत आहेत.