पाच वर्षांपासून ‘विश्व रक्तदाता दिवस’ साजरा करणारा ‘मंच’
By admin | Published: June 14, 2017 02:45 AM2017-06-14T02:45:11+5:302017-06-14T02:46:37+5:30
आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिर : मारवाडी युवा मंच कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: १४ जून हा जागतिक रक्तदाता दिवस २००४ पासून साजरा केला जातोय. वाशिम येथील मारवाडी युवा मंच गत पाच वर्षांपासून या दिनी रक्तदान शिबिरे घेऊन रक्तदानाबाबत जनजागृती करीत आहेत.
रक्तदान हे जगातील एक सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानासारखे दुसरे कोणतेही अमूल्य भेट नाही. त्यात गंमत अशी की ही भेट तुम्ही कोणाला देताय हे बहुतेक वेळा तुम्हाला माहीतही नसते. यापेक्षा दुसरे नि:स्वार्थी कृत्य नाही. १४ जून हा वर्ल्ड ब्लड डोनर डे (जागतिक रक्तदाता दिवस) म्हणून मानला जातो. ज्या व्यक्तींनी आजपर्यंत रक्तदान केले त्यांचे आभार मानण्याकरिता तसेच रक्तदानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याकरिता वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायजेशनने (जागतिक आरोग्य संस्था) २००४ पासून या दिवसाची सुरुवात केली आहे. हा दिवस वाशिम शहरातील मारवाडी युवा मंचच्यावतीने गत पाच वर्षांपासून अविरत राबविण्यात येत आहे. या दिवशी रक्तदान शिबिरासह जनजागृतीचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे. तुमच्यातील अनेक जणांनी रक्तदान स्वत:हून किंवा गरजेपोटी केले असेल; मात्र रक्तदान कधी, कुठे, करावे, कोणती कोळजी घ्यावी या बाबी बघणेही तितकेच गरजेचे आहे. चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी, तसेच चुकीच्या मार्गदर्शनाखाली जर रक्तदान केले तर अनेक आजार होण्याचा धोका असतो. याबाबत या दिवशी या मंचच्यावतिने जनजागृतीही केल्या जाते. मारवाडी युवा मंचच्यावतीने १४ जून रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत शहरातील अग्रसेन भवन, महेश भवन, जैन भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान तसेच इतरांना प्रोत्साहित करण्यसाचे आवाहन मारवाडी युवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी मारवाडी युवा मंचचे सर्व पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.