प्लॅटफॉर्म तिकीट आता ३० रुपये; तरी गर्दी ओसरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:40+5:302021-03-13T05:16:40+5:30
वाशिममार्गे सध्या हैदराबाद-अजमेर एक्स्प्रेस, हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस, नांदेड जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस, यशवंतपूर-इंदोर एक्स्प्रेस, कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस आणि काचीगुडा नरखेड इंटरसिटी या ...
वाशिममार्गे सध्या हैदराबाद-अजमेर एक्स्प्रेस, हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस, नांदेड जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस, यशवंतपूर-इंदोर एक्स्प्रेस, कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस आणि काचीगुडा नरखेड इंटरसिटी या सहा रेल्वे धावत आहेत. पूर्णत: आरक्षित असलेल्या या रेल्वेंमधून एकूण क्षमतेच्या ४० ते ५० टक्के प्रवासी प्रवास करीत आहेत. दरम्यान, रेल्वेस्थानकावर प्रवाशांव्यतिरिक्त इतरांची गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटचे दर ३० रुपये करण्यात आले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रमाणात नाही; पण रेल्वे येताना व जाताना नागरिकांची बऱ्यापैकी गर्दी रेल्वे स्थानकावर राहत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
.................
बॉक्स :
सध्या धावताहेत पाच एक्स्प्रेस रेल्वेगाड्या
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाशिममार्गे पॅसेंजर रेल्वे अद्याप सुरू करण्यात आलेली नाही; मात्र पूर्णत: आरक्षित असलेल्या पाच एक्स्प्रेस गाड्या आठवड्यातून ठराविक दिवसाला धावत आहेत. यासह इंटरसिटी एक्सप्रेस दैनंदिन धावत आहे.
.................
रेल्वेच्या प्रवाशांची संख्या ५० टक्क्यांवर
हैदराबाद-अजमेर, हैदराबाद-जयपूर, नांदेड-जम्मूतावी, यशवंतपूर-इंदाेर आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस आणि काचीगुडा नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेसने पूर्वीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे विशेष धोका असल्याचे जाणवत नाही.
..................
दररोज विकले जातात ५० प्लॅटफॉर्म तिकिटे
प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर सध्या वाढवून ३० रुपये करण्यात आले आहेत. असे असतानाही दररोज साधारणत: ४० ते ५० प्लॅटफॉर्म तिकिटे विकली जात आहेत. कधीकधी हे प्रमाण २० पर्यंत उतरते; तर कधी वाढतही असल्याचे सूत्रांनी सांगितले.
............
प्रतिक्रिया
घरच्या लोकांना अकोला येथे जायचे होते. दुपारी ४.३० वाजताच्या इंटरसिटी एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन केले. त्यांच्यासोबत बरेच सामान असल्याने ते घेऊन त्यांना सोडण्याकरिता रेल्वेस्थानकावर आलो. ३० रुपये प्लॅटफॉर्म तिकिटासाठी खर्च करावे लागले.
- ओम कव्हर
.......................
काहीच काम नसताना रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ३० रुपये खर्चून तर कोणी येणार नाही ना. आधीच रेल्वे प्रवासाचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले. त्यातच प्लॅटफॉर्म तिकिटाचे दरही वाढले आहेत. रेल्वे विभागाने ते कमी करायला हवे.
- प्रतीक पाटील
...........................
कोट :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी काही प्रमाणात प्लॅटफॉर्म तिकीटचे दर वाढविण्यात आले आहेत. परिस्थिती आटोक्यात येताच ते कमी करण्यात येतील.
- महेंद्र उजवे
रेल्वेस्थानक अधीक्षक, वाशिम