खेळाडूंचा सराव गवत, झुडपांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 02:44 PM2018-11-16T14:44:58+5:302018-11-16T14:45:07+5:30
मंगरुळपीर: तालुक्यातील विद्यार्थी, युवकांच्या क्रीडा गुणांना विकसीत करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाची पार दैना झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: तालुक्यातील विद्यार्थी, युवकांच्या क्रीडा गुणांना विकसीत करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाची पार दैना झाली आहे. येथील धावपट्टीस परिसरात झुडपे आणि गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून, घाणकचºयाचा विळखाही क्रीडा संकुलास बसला आहे. याच वातावरणात खेळाडू नाईलाजास्तव सराव करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मंगरुळपीर येथे साधारण २५ वर्षांपूर्वी तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरातील मोकळ्या जागेत भव्य, असे क्रीडा संकुल तयार करण्यात आले. या ठिकाणी २०० मीटरची धावपट्टी आणि मैदानी खेळासाठी सुव्यवस्थीत क्रीडांगण, तसेच इनडोअर खेळांसाठी इमारतीत सोयीसुविधा उभारण्यात आल्या. सुरुवातीची काही वर्षे या क्रीडा संकुलाची नियमित देखभाल होत राहिल्याने तालुक्यातील खेळाडूंच्या क्रीडा गुणांना विकसीत होण्यास फायदा झाला; परंतु मागील काही वर्षांत या क्रीडा संकुलाकडे पार दुर्लक्ष झाले आहे. परिसरात मोठी झुडपे वाढली असून, धावपट्टीसह इतर भागात गवत वाढले असून, घाणकचराही पसरला आहे. त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव झाला आहे. याच वातावरणात खेळाडू सराव करीत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळते. अशा वातावरणात सराव केल्याने खेळाडूंचे आरोग्यबाधित होऊन त्यांना आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सराव करताना असे घडल्यास खेळाडूला स्पर्धेपासून वंचितही राहावे लागणार आहे.
रात्रीच्या वेळी मद्यप्राशनाचे प्रकार
मंगरुळपीर तालुका क्रीडा संकुल परिसर मोकळाच असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी शहरातील आंबट शौकिन जुगार खेळण्यासह मद्यप्राशन करीत असल्याचे दिसते. मद्यप्राशन केल्यानंतर दारूव्या बाट्यला फोडून मैदानातच फेकण्यात येतात. त्यामुळे पडलेल्या काचांपासून खेळाडूंना दुखापत होण्याचीही भिती आहे.