'पीएम किसान'ची रक्कम लाभार्थींऐवजी जमा होत आहे दुसऱ्याच खात्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:28 AM2019-12-08T11:28:48+5:302019-12-08T11:29:12+5:30
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरु केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदानाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे.
- निनाद देशमुख
रिसोड: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांच्या आधार कार्डमधील नाव आणि क्रमांकात असलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत असताना याच योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे सहा हजारांचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसून, दुसऱ्याच खात्यात जमा होत असल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात घडत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रकार घडत असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरु केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदानाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा रिसोड तालुक्यात आली. रिसोड शहर व तालुक्यातील रिठद येथील शेतकऱ्यांबाबत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभार बद्दल रोष व्यक्त केला जात आहे.
रिसोड येथील नरसेविका फरजाना बी शेख अख्तर यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे. एकदिवस खात्यातील शिल्लक रकमेबाबत त्यांनी चौकशी केली असता शेतकरी सन्मान योजनेच्या हफ्त्यातील सहा हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे त्यांना कळले. त्यांचा मुलगा अकबर बागवान यांनी याबद्दल चौकशी केली व त्यांचे सहकारी प्रा. नजीर काजी यांच्यासोबत संबंधित शेतकऱ्याचा पत्ता लावला. त्यावेळी रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथील शेतकरी तेजराव कांबळे यांची रक्कम असल्याचे कळले.
दुसरी घटना रिसोड तालुक्यातील रिठद येथे घडली. येथील अल्पभूधारक शेतकरी सय्यद कमर सैयद मुनीर यांचे रिठद येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असून शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान त्यांच्या यांच्या खात्यात जमा न होता वाशीम येथील वसंता आश्रुबा खरडे यांच्या खात्यात जात होते. खरडे यांचा खाते त्याच बँकेत आहे.
रिसोड तालुक्यातील वाघी खु. येथील शेतकरी तेजराव कांबळे यांचे शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान आपल्या आईच्या (फरजाना बी. अख्तर) खात्यावर जमा झाले होते. याबाबत आपण विस्तृत माहिती घेऊन तेजराव कांबळे यांचा पत्ता घेतला आणि त्यांच्या हक्काची रक्कम त्यांना परत करुन आपले कर्तव्य पार पाडले. - अकबर बागवान ( नागरिक, रिसोड )
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खाते क्रमांकात त्रुटी असल्याने हा प्रकार घडत आहे. याची पडताळणी करण्यात येत आहे. आपल्यापूर्वी कार्यरत तहसीलदारांच्या कार्याकाळात हा प्रकार घडला असला तरी, शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक दुरुस्ती करुन घेतली जात आहे. - ए.एन.शेलार ( तहसीलदार, रिसोड )