जिल्हा परिषदांमध्ये कार्यान्वित होणार ‘पीएम’ प्रणाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 02:50 PM2019-07-09T14:50:12+5:302019-07-09T14:50:22+5:30
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट (पीएम) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बांधकामविषयक कामांमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट (पीएम) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. यासंदर्भातील निर्णय शासनाने ६ जुलै रोजी पारित केला.
शासनाने प्रायोगिक तत्वावर आधी ‘पीएमएस’करिता नाशिक जिल्हा परिषदेची निवड करण्यात आली. याअंतर्गत बांधकाम, लघू पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांच्या विविध प्रकल्पांकरिता प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये कामांची मोजमाप पुस्तिका नोंदविणे, देयके नोंदविण्याची कामे सुलभ झाली आहेत. त्या धर्तीवर आता राज्यभरातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदांनी आपापल्या कार्यालयांमधील तंत्रस्नेही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व त्यांना प्रवीण प्रशिक्षकाचा दर्जा द्यावा, असे आदेश देण्यासोबतच अन्य मार्गदर्शक सूचनाही करण्यात आल्या आहेत.
‘सीडॅक’सोबत करारनामा
‘पीएमएस’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने ‘सीडॅक’ या केंद्रशासनाच्या संस्थेशी करारनामा केला असून सदर संस्थेने राज्यातील सहा विभागामधील प्रत्येकी एका जिल्हा परिषदेत ‘पीएमएस’ तत्काळ कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी. तद्वतच संबंधित जिल्हा परिषदांनी यासंदर्भातील अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.