६०० बालकांना दिली न्यूमोकोकल क्वांजुगेट लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:15 PM2021-07-29T12:15:06+5:302021-07-29T12:15:15+5:30
Pneumococcal quanjugate vaccine : आतापर्यंत ६ आठवड्यांच्या अर्थात दीड महिन्याच्या ६०० बालकांना पहिला डोस देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एका वर्षाच्या आतील बालकांचे न्यूमोकोकल या जिवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोनिया आणि मेनिनजायटिस या आजारापासून रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १२ जुलैपासून न्यूमोकोकल क्वांजुगेट लसीकरणाचा (पीसीव्ही) शुभारंभ झाला असून, आतापर्यंत ६ आठवड्यांच्या अर्थात दीड महिन्याच्या ६०० बालकांना पहिला डोस देण्यात आला.
न्यूमोकोकल आजारामुळे बाधित बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते किंवा काही बाधित बालकांचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियल न्यूमोनिया हे पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे.
पीसीव्ही ही लस बालकांना होणाऱ्या तीव्र स्वरूपातील न्यूमोनियाचे प्रमुख कारण असलेल्या न्यूमोकोकल न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण करण्याचे प्रभावी साधन आहे. सर्व शासकीय आरोग्य संस्थेत ही लस बालकांना मोफत देण्यात येत आहे. याबाबत आरोग्य विभागातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य संस्थेत ही लस उपलब्ध आहे. बालकांना या लसीमुळे कोणतीही रिअॅक्शन येत नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी स्पष्ट केले.