६०० बालकांना दिली न्यूमोकोकल क्वांजुगेट लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:21+5:302021-07-29T04:41:21+5:30
वाशिम : एका वर्षाच्या आतील बालकांचे न्यूमोकोकल या जिवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोनिया आणि मेनिनजायटिस या आजारापासून रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १२ ...
वाशिम : एका वर्षाच्या आतील बालकांचे न्यूमोकोकल या जिवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोनिया आणि मेनिनजायटिस या आजारापासून रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १२ जुलैपासून न्यूमोकोकल क्वांजुगेट लसीकरणाचा (पीसीव्ही) शुभारंभ झाला असून, आतापर्यंत ६ आठवड्यांच्या अर्थात दीड महिन्याच्या ६०० बालकांना पहिला डोस देण्यात आला.
न्यूमोकोकल आजारामुळे बाधित बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते किंवा काही बाधित बालकांचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियल न्यूमोनिया हे पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. पीसीव्ही ही लस बालकांना होणाऱ्या तीव्र स्वरूपातील न्यूमोनियाचे प्रमुख कारण असलेल्या न्यूमोकोकल न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण करण्याचे प्रभावी साधन आहे. सर्व शासकीय आरोग्य संस्थेत ही लस बालकांना मोफत देण्यात येत आहे. बालकांना या लसीमुळे कोणतीही रिअॅक्शन येत नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी स्पष्ट केले.
--------------------------------बॉक्स...
न्यूमोकोकल क्वांजुगेट लस आवश्यक का?
दोन वर्षांच्या आतील बालकांना स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बॅक्टेरियामुळे न्यूमोनिया हा आजार होण्याचे प्रमुख कारण आहे. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा आजार आहे. त्यामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. प्रसंगी मुले बेशुद्ध होऊ शकतात व मृत्यूदेखील होऊ शकतो. हे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पात्र बालकांना न्यूमोकोकल क्वांजुगेट लस देणे आवश्यक आहे.
-----------------------बॉक्स...
तीन डोसमध्ये दिली जाते लस !
‘पीसीव्ही’ लसीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ही लस तीन डोसमध्ये देण्यात येते. पहिला डोस हा बालकाला वयाच्या ६ आठवड्यांत, दुसरा डोस १४ आठवड्यांत आणि तिसरा बूस्टर डोस वयाच्या ९ व्या महिन्यात किंवा जास्तीत जास्त वयाच्या पहिल्या वर्षी देता येतो.
--------------------------बॉक्स...
जिल्हा कृती दलाची सभा
पीसीव्ही लसीच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा कृती दलाची सभा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, कृती दलाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी गावंडे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला.
------------------------------
लसीचे एकूण प्राप्त डोस - १२००
किती बालकांना दिली लस - ६००
--------------------------खासगी रुग्णालयात लसीची किंमत - ५०००
सरकारी रुग्णालयात - लस मोफत