फवारणीतून ५७ जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:41 AM2020-08-29T11:41:50+5:302020-08-29T11:41:56+5:30
जिल्ह्यात यंदा आजवर ५७ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कृषी विभागाच्यावतीने कीटकनाशक फवारणीतून शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होऊ नये, यासाठी गावागावांत मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यानंतरही जिल्ह्यात यंदा आजवर ५७ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. तथापि, वेळीच उपचार घेतल्याने सर्वांची प्रकृती सुधारली.
गेल्या तीन, चार वर्षांपासून शेतकरी, शेतमजुरांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याच्या घटना घडत आहेतं. यात दोन वर्षांपूर्वी या प्रकारांतून काही शेतमजुरांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने राज्यभरात कीटकनाशक फवारणीबाबत शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची मोहिम सुरू केली. त्याचा बराच फायदाही झाला; परंतु कृषी विभागाच्या प्रयत्नानंतरही यंदा वाशिम जिल्ह्यात १ एप्रिल ते २९ आॅगस्टदरम्यानच्या कालावधित ५७ जणांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याचे प्रकार घडले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी या संदर्भात कृषी विभागाला माहितीही दिली असून. कीटकनाशक विषबाधा झालेल्या शेतकरी, शेतमजुरांवर वेळीच उपचार करण्यात आल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली आणि आजवरच्या सर्वच बाधित रुग्णांना घरीही सोडण्यात आले. गावागावांत कृ षी विभागाकडून फवारणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शेतीशाळांचे आयोजन केले जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक वेगवेगळ्या ठिकाणी शेताच्या बांधावर या कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. या सर्व प्रयत्नानंतरही जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून होणारे विषबाधेचे प्रकार घडत आहेत. ही बाब निश्चितच चिंताजनक असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.
विषबाधेचे परिणाम गंभीर
कीटकनाशक फवारणीतून होणाºया विषाबाधेतून संबंधित व्यक्ती वाचल्यानंतरही त्याच्या शरीरावर कीटकनाशक औषधीमुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यात डोळ्यांवर, मेंदूवर परिणाम होऊन अर्धांगवायू, मुत्रपिंड निकामी होऊ शकतात.